केज: केज-कळंब मार्गावर नव्याने सुरू करण्यात आलेल्या पर्यावरणपूरक ई-बसमध्ये सवलतीचे विद्यार्थी पास ग्राह्य धरले जात नसल्याने संतप्त झालेल्या विद्यार्थ्यांनी शनिवार, १७ ऑक्टोबर रोजी सकाळी साडेआठ वाजण्याच्या सुमारास माळेगाव फाटा येथे जोरदार रस्ता रोको आंदोलन केले. अचानक केलेल्या या आंदोलनामुळे मार्गावरील वाहतूक काही काळ पूर्णपणे ठप्प झाली होती.
शिक्षणावर गदा आल्याने रोष
कळंब आगाराने या मार्गावर प्रदूषणमुक्त ई-बस सुरू करताना नियमित लाल बसेस बंद केल्या आहेत. मात्र, या नव्या बसमध्ये शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या मासिक पासची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली नाही. त्यामुळे साळेगाव, माळेगाव, शेलगाव गांजी, बोबडेवाडी, सुकळी, सातेफळ, मांगवडगाव, हदगाव, डोका, सारूकवाडी आणि चिंचोली माळी या परिसरातील विद्यार्थ्यांना केज व कळंब येथे शिक्षणासाठी जाताना दररोज आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. बस पासची सुविधा नसल्याने ग्रामीण भागातील अनेक मुलींचे शिक्षणच धोक्यात आले आहे.
विद्यार्थी आक्रमक
प्रशासनाच्या या आडमुठ्या भूमिकेमुळे शिक्षणापासून वंचित राहण्याची वेळ आल्याने संतप्त विद्यार्थ्यांनी रस्त्यावर उतरून संताप व्यक्त केला. जोपर्यंत ई-बसमध्ये विद्यार्थी पास लागू केला जात नाही किंवा नियमित बसेस पूर्ववत सुरू केल्या जात नाहीत, तोपर्यंत माघार घेणार नाही, अशी ठाम भूमिका आंदोलक विद्यार्थ्यांनी घेतली. या आंदोलनामुळे एसटी महामंडळाच्या ढिसाळ नियोजनावर प्रवाशांमधूनही तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.













प्रतिक्रिया (०)
अद्याप प्रतिक्रिया नाहीत. पहिली प्रतिक्रिया तुम्हीच द्या!