दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर रविवारी खेळल्या गेलेल्या महिला आशिया कप २०२६ च्या अंतिम सामन्यात भारतीय संघाने श्रीलंकेचा ७२ धावांनी दणदणीत पराभव केला आहे. या विजयासह हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने विक्रमी आठव्यांदा आशिया कपवर आपले नाव कोरले. स्मृती मानधना आणि शेफाली वर्मा यांच्या स्फोटक फलंदाजीनंतर श्री चरणी आणि दीप्ती शर्मा यांच्या फिरकीच्या जोरावर भारताने हा ऐतिहासिक विजय मिळवत २०२४ मधील पराभवाचा हिशोब चुकता केला.

मानधना आणि शेफालीची तुफानी खेळी

नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना भारतीय महिला संघाने २० षटकांत ५ बाद १८३ धावांचा डोंगर उभारला. भारताच्या डावाची सुरुवात शेफाली वर्मा आणि उपकर्णधार स्मृती मानधना यांनी अत्यंत आक्रमकपणे केली. शेफालीने अवघ्या २४ चेंडूत या स्पर्धेतील सर्वात वेगवान अर्धशतक झळकावले. तिने ३९ चेंडूत नऊ चौकार आणि दोन षटकारांच्या मदतीने ६८ धावा केल्या. दुसरीकडे, स्मृती मानधनाने तिला उत्तम साथ देत ३९ चेंडूत ५९ धावांची खेळी केली. या दोघींनी पहिल्या विकेटसाठी १२.५ षटकात १२९ धावांची भक्कम भागीदारी करून भारताच्या विजयाचा पाया रचला.

चरणी आणि दीप्तीचा श्रीलंकेला दणका

भारताने दिलेल्या १८४ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना श्रीलंकेचा डाव सुरुवातीपासूनच गडगडला. कर्णधार चमारी अटापट्टू हिने ३६ धावा करत थोडा प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला, मात्र भारतीय गोलंदाजांच्या भेदक माऱ्यासमोर इतर फलंदाजांनी नांगी टाकली. भारताची फिरकीपटू श्री चरणी हिने उत्कृष्ट गोलंदाजी करत ४ षटकांत अवघ्या २० धावा देऊन ४ बळी घेतले. तसेच दीप्ती शर्माने ३ बळी घेत श्रीलंकेचे कंबरडे मोडले. परिणामी, श्रीलंकेचा संपूर्ण संघ २० षटकांत केवळ १११ धावांवर आटोपला.