यवतमाळच्या टिपेश्वर अभयारण्यातून स्वतःच्या हक्काच्या जंगलाच्या शोधात निघालेला पट्टेदार वाघ तब्बल शंभर वर्षांनंतर बीड जिल्ह्याच्या आष्टी आणि पाटोदा वनक्षेत्रात आढळून आला आहे. आष्टी तालुक्यातील ब्रह्मगाव वनपरिक्षेत्रात २० ऑगस्ट रोजी हा वाघ ट्रॅप कॅमेऱ्यात कैद झाला होता. १९१०-१९२० च्या दशकानंतर पहिल्यांदाच या भागात वाघाचे अस्तित्व दिसल्याने बीड जिल्ह्याच्या वन्यजीव संवर्धनासाठी ही अत्यंत ऐतिहासिक आणि सकारात्मक बाब मानली जात आहे.

२०२३ मध्ये यवतमाळहून निघालेल्या या चार वर्षीय नर वाघाने चंद्रपूर, धाराशिव, लातूर आणि अहिल्यानगर असा प्रवास करत बीड जिल्ह्यात प्रवेश केला होता. सुमारे २०० किलो वजन असलेला हा वाघ वर्षातील ३ ते ४ महिने बीड जिल्ह्याच्या वनक्षेत्रात ये-जा करत असतो. आता हा वाघ सोलापूर जिल्ह्यातील बार्शी येथील 'कारी' परिसरात पोहोचला आहे. हा वाघ माणसांपासून दूर राहत असल्याने नागरिकांना घाबरण्याचे कोणतेही कारण नाही. मात्र, सुरक्षेचा उपाय म्हणून परिसरातील नागरिकांनी आणि पशुपालकांनी वनक्षेत्र आणि डोंगर पट्ट्यात जाणे टाळावे, असे आवाहन आष्टीचे वनपरिक्षेत्र अधिकारी अमोल मुंडे यांनी केले आहे.