कमी पाण्याच्या रब्बी पिकांसाठी बियाणे अनुदानासाठी अर्ज सुरू
बीड जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थिती आणि लहरी हवामानाच्या पार्श्वभूमीवर, येत्या रब्बी हंगामात शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा देण्यासाठी कृषी विभागाने बियाणे वितरण आणि पीक प्रात्यक्षिकांसाठी विशेष अनुदान योजना जाहीर केल्या आहेत. यंदा कमी पाण्यात येणाऱ्या तेलबिया व कडधान्य पिकांना सर्वाधिक प्राधान्य दिले जाणार असून, शेतकऱ्यांनी याचा लाभ घेण्यासाठी महाडीबीटी पोर्टलवर ऑनलाईन अर्ज करावेत, असे आवाहन कृषी प्रशासनाने केले आहे.
राष्ट्रीय खाद्यतेल अभियान, कडधान्य आत्मनिर्भरता अभियान आणि राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानांतर्गत हरभरा, गहू, रब्बी ज्वारी, भुईमूग, सूर्यफूल व करडई या पिकांसाठी हे अनुदान मिळणार आहे. यामध्ये गट प्रात्यक्षिकांसाठी प्रतिहेक्टरी भुईमुगाला १४ हजार, हरभऱ्याला १० हजार, सूर्यफूल व गव्हाला प्रत्येकी ९ हजार, करडईला ८ हजार तर रब्बी ज्वारीसाठी ७ हजार ५०० रुपये अनुदान दिले जाईल. तसेच हरभरा बियाण्यावर प्रतिकिलो ४० ते ६० रुपये आणि ज्वारीच्या प्रमाणित बियाण्यावर १५ ते ३० रुपये अनुदान उपलब्ध आहे. आधुनिक शेतीसाठी ऊस-हरभरा आंतरपिकाला प्रतिहेक्टरी ९ हजार आणि सुपर केन नर्सरीसाठी १० हजार रुपये किंवा खर्चाच्या ५० टक्के अनुदान मिळेल.
या योजनांमध्ये महिला शेतकरी, अनुसूचित जाती-जमाती आणि दिव्यांग बांधवांना प्रथम प्राधान्य दिले जाणार आहे. इच्छुक शेतकऱ्यांनी स्वतः किंवा जवळच्या सीएससी केंद्रावरून महाडीबीटी पोर्टलवर अर्ज करावेत आणि अधिक माहितीसाठी तालुका कृषी कार्यालयाशी संपर्क साधावा.













प्रतिक्रिया (०)
अद्याप प्रतिक्रिया नाहीत. पहिली प्रतिक्रिया तुम्हीच द्या!