बीड/सांगली: सांगली जिल्ह्यातील शिराळा-बिऊर रस्त्यावर पेट्रोल पंपासमोर रविवारी दुपारी भरधाव मोटारीने दुचाकीला पाठीमागून दिलेल्या धडकेत दोन जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. प्रवीण बाबू यमगर आणि नंदिनी दगडू सदगर अशी या अपघातात जीव गमावलेल्या तरुण-तरुणीची नावे आहेत. हे दोघेही मूळचे बीड जिल्ह्यातील शिरूर कासार तालुक्यातील हाटकरवाडी येथील रहिवासी असून, पोटाची खळगी भरण्यासाठी आलेल्या या कुटुंबांवर आता दुःखाचा मोठा डोंगर कोसळला आहे.

प्रवीण आणि नंदिनी यांचे कुटुंबीय वाळवा तालुक्यातील साखराळे येथे ऊसतोड मजूर म्हणून काम करतात. रविवारी दुपारी अडीचच्या सुमारास हे दोघे शिराळा येथे देवदर्शनासाठी गेले होते. दर्शन घेऊन परतताना पेट्रोल भरण्यासाठी पंपाकडे जात असताना मागून येणाऱ्या एका भरधाव मोटारीने त्यांच्या दुचाकीला जोराची धडक दिली. ही धडक इतकी भयंकर होती की नंदिनी उडून थेट मोटारीच्या बोनेटवर आदळली, तर प्रवीण रस्त्यावर फेकला गेला.

स्थानिक ग्रामस्थांनी तातडीने रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या दोघांनाही ईश्वरपूर येथील खासगी रुग्णालयात दाखल केले. मात्र, गंभीर दुखापत झाल्याने नंदिनीचा उपचारापूर्वीच तर प्रवीणचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या घटनेनंतर मोटारचालक वाहन घटनास्थळीच सोडून फरार झाला आहे. संदीप यमगर यांच्या फिर्यादीनुसार शिराळा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिस या घटनेचा पुढील तपास करत आहेत. ऊसतोड मजुरांच्या मुलांवर काळाने असा घाला घातल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.