शिरूर कासार तालुक्यातील पिंपळनेर येथे भरदिवसा घरफोडी झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. घरचे सर्व सदस्य देवदर्शनासाठी बाहेर गेल्याची संधी साधत अज्ञात चोरट्यांनी बंद घराचे कुलूप तोडले आणि घरातील १ लाख २८ हजार ९०० रुपयांचे सोन्याचे दागिने लंपास केले. ही घटना १७ ऑक्टोबर रोजी दुपारच्या सुमारास घडली असून या प्रकरणी शिरूर कासार पोलीस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पिंपळनेर येथील रहिवासी महादेव किसन खरमाटे हे आपल्या कुटुंबीयांसह अहिल्यानगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील मोहटादेवीच्या दर्शनासाठी गेले होते. घराला कुलूप असल्याचे पाहून अज्ञात चोरट्याने कडी-कोयंडा तोडून घरात प्रवेश केला. घरातील कपड्यात बांधून ठेवलेले ६ ग्रॅम वजनाचे सोन्याचे झुंबर आणि गळ्यातील पोतीचे ५ ग्रॅमचे मणी असा एकूण ११ ग्रॅम वजनाचा ऐवज चोरट्याने पळवून नेला.
देवदर्शन करून सायंकाळी कुटुंब घरी परतल्यानंतर घराचा कडी-कोयंडा तुटलेला दिसला आणि चोरीचा हा प्रकार उघडकीस आला. या प्रकरणी महादेव खरमाटे यांच्या फिर्यादीवरून शिरूर कासार पोलिसांनी गुन्हा नोंदवला असून ग्रेड पोलीस उपनिरीक्षक जायभाये पुढील तपास करत आहेत.













प्रतिक्रिया (०)
अद्याप प्रतिक्रिया नाहीत. पहिली प्रतिक्रिया तुम्हीच द्या!