कोर्टात सुरू असलेल्या जमिनीच्या वादाचा राग मनात धरून एका सेवानिवृत्त शिक्षकावर लोखंडी रॉडने जीवघेणा हल्ला केल्याची घटना शिरूर कासार तालुक्यातील लोणी येथे घडली आहे. या हल्ल्यात ५९ वर्षीय शिक्षक गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणी शिरूर कासार पोलिसांनी एका संशयिताविरुद्ध खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.

लोणी येथील रहिवासी केशव उद्धव बडे हे सेवानिवृत्त शिक्षक असून शेती करतात. १४ ऑक्टोबर रोजी सकाळी साडेनऊ वाजेच्या सुमारास ते गावातील किराणा दुकानात सामान आणण्यासाठी जात होते. त्यावेळी गावातीलच गोकुळ अर्जुन बडे याने त्यांना रस्त्यात अडवले. ‘तू माझ्याविरुद्ध कोर्टात शेतीचा दावा का दाखल केलास,’ असा जाब विचारत त्याने आधी अश्लील शिवीगाळ करण्यास सुरुवात केली.

त्यानंतर संतापलेल्या गोकुळ बडे याने हातातील लोखंडी रॉडने केशव बडे यांच्या डोक्यावर आणि डाव्या कानावर जोरदार प्रहार करून त्यांना रक्ताच्या थारोळ्यात पाडले. आरडाओरड झाल्यानंतर आरोपीने त्यांना जीवे मारण्याची धमकी देऊन घटनास्थळावरून पळ काढला. या प्रकरणी जखमी केशव बडे यांच्या फिर्यादीवरून शिरूर कासार पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पोलीस उपनिरीक्षक कुलकर्णी अधिक तपास करत आहेत.