बीड तालुक्यातील गोलंग्री शिवारात शेतातील पाण्याच्या पंपासाठी बसवलेली तांब्याची वायर अज्ञात चोरट्याने कापून नेल्याची घटना घडली आहे. १४ ते १५ ऑक्टोबर दरम्यान घडलेल्या या चोरीमुळे शेतकऱ्यांचे पिकांना पाणी देणे बंद झाले असून, या प्रकरणी नेकनूर पोलिसांनी गावातीलच एका संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
गोलंग्री येथील शेतकरी नितीन गोवर्धन कवडे यांनी आपल्या शेत गट क्रमांक २६ मधील विहिरीवरून १०० फूट लांबीची काळ्या रंगाची तांब्याची केबल वायर बसवली होती. आरोपी श्रीराम वासुदेव शिंदे याने शेतात कोणी नसल्याची संधी साधून ही ६ हजार रुपयांची वायर कापून चोरून नेली. याशिवाय गावातील इतर शेतकऱ्यांच्या शेतातील वायर्सही चोरीला गेल्याचे समोर आले आहे.
सकाळी शेतात पाणी देण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्यांना वायर कापल्याचे दिसून आले. नितीन कवडे यांच्या फिर्यादीवरून नेकनूर पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा नोंदवण्यात आला असून पोलीस हवालदार गर्जे या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.













प्रतिक्रिया (०)
अद्याप प्रतिक्रिया नाहीत. पहिली प्रतिक्रिया तुम्हीच द्या!