बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी एक अत्यंत दिलासादायक बातमी आहे. खतांचा काळाबाजार आणि लिंकिंगची सक्ती रोखण्यासाठी येत्या २२ ऑक्टोबरपासून जिल्ह्यात रासायनिक खतांच्या विक्रीसाठी 'एफएफएस' (Framework for Fertilizer Sale) प्रणाली लागू करण्यात येणार आहे. जिल्हा परिषद कृषी विभागाने घेतलेल्या या महत्त्वपूर्ण निर्णयामुळे आता शेतकऱ्यांना खत खरेदीसाठी दुकानांसमोर तासन्तास रांगा लावण्याची किंवा अनावश्यक गर्दी करण्याची गरज उरणार नाही.
या नव्या व्यवस्थेमुळे शेतकरी थेट आपल्या मोबाईलवरून 'एफएफएस' ॲपद्वारे खताची उपलब्धता तपासून बुकिंग करू शकतील. ॲपमध्ये आधार कार्ड किंवा शेतकरी ओळखपत्राने लॉगिन करून, आपल्या जमिनीच्या सर्व्हे नंबरची आणि पिकाची नोंद केल्यावर जवळच्या सोयीच्या विक्रेत्याची निवड करता येईल. या प्रक्रियेनंतर मोबाईलवर एक क्यूआर कोड जनरेट होईल, जो ७२ तासांसाठी वैध असेल. खत दुकानात जाऊन हाच कोड दाखवल्यास शेतकऱ्यांना त्यांच्या गरजेपुरते खत त्वरित मिळेल.
या पारदर्शक प्रक्रियेमुळे खतासोबत इतर अनावश्यक औषधे किंवा खते माथी मारण्याची व्यापाऱ्यांची सक्ती पूर्णपणे थांबेल. तसेच युरियाचा गैरवापर आणि बनावट खतांनाही मोठा आळा बसेल. जिल्ह्यातील सर्व शेतकरी बांधवांनी या डिजिटल सुविधेचा वापर करून खत खरेदी करावी, तसेच कोणीही जादा दराने विक्री करत असल्यास त्वरित प्रशासनाकडे तक्रार करावी, असे आवाहन जिल्हा परिषदेच्या कृषी विकास अधिकाऱ्यांनी केले आहे.













प्रतिक्रिया (०)
अद्याप प्रतिक्रिया नाहीत. पहिली प्रतिक्रिया तुम्हीच द्या!