बीड - जिल्ह्यातील संभाव्य दुष्काळजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर लहान बालके, गरोदर महिला आणि स्तनदा मातांचे आरोग्य अबाधित राखण्यासाठी प्रशासनाने पूर्ण क्षमतेने सतर्क राहावे. जिल्ह्यातील एकही पात्र लाभार्थी पूरक पोषण आहारापासून वंचित राहता कामा नये, याबाबत विशेष खबरदारी घेण्याचे कडक निर्देश जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी दिले. जिल्हा परिषदेच्या महिला व बाल विकास विभागाच्या जिल्हास्तरीय पोषण आहार संनियंत्रण समितीच्या आढावा बैठकीत ते बोलत होते.
'आयसीडीएस' योजनेची काटेकोर अंमलबजावणी
खरीप हंगामातील पावसाची तूट व प्रतिकूल हवामानामुळे उद्भवलेल्या दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर ग्रामीण व टंचाईग्रस्त भागातील संवेदनशील घटकांवर विपरीत परिणाम होऊ नये, यासाठी एकात्मिक बाल विकास सेवा योजना (ICDS) अधिक गतिमान करण्याचे निर्देश शासनाने दिले आहेत. या अनुषंगाने आयोजित बैठकीत जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्ह्यातील पोषण आहार पुरवठा साखळी, उपलब्ध अन्नधान्य साठा, पिण्याचे पाणी आणि इंधन उपलब्धतेचा सविस्तर आढावा घेतला.
जिल्ह्यातील सुमारे १ लाख ४० हजार लाभार्थ्यांना पोषण आहार
बैठकीत दिलेल्या माहितीनुसार, जिल्ह्यातील अंगणवाडी केंद्रांमार्फत सध्या ३ ते ६ वर्षे वयोगटातील ५९ हजारांहून अधिक बालकांना गरम ताजा आहार (HCM) दिला जात आहे. तसेच ६ महिने ते ३ वर्षे वयोगटातील बालके, तीव्र कमी वजनाची बालके आणि गरोदर व स्तनदा माता अशा एकूण सुमारे ८१ हजार लाभार्थ्यांना घरपोच पोषण आहार (THR) नियमित पुरविला जात आहे. ग्रामीण भागासह बीड पूर्व व पश्चिम या नागरी प्रकल्पांमधील अंगणवाड्यांमध्ये महिला बचत गट व सेविकांमार्फत सकाळचा नाश्ता व दुपारचा पौष्टिक आहार सुरळीत सुरू आहे.
आगामी काळात तुटवडा भासू न देण्याच्या सूचना
सद्यस्थितीत जिल्ह्यात ऑक्टोबर व नोव्हेंबर महिन्यासाठीचा अन्नधान्य व पोषण आहार पुरवठा पूर्ण झाला असून, पुढील महिन्यांची मागणीही नोंदवण्यात आली आहे. सध्या कोणत्याही केंद्रावर अन्नधान्य, पाणी अथवा इंधनाचा तुटवडा नाही. मात्र, आगामी काळात दुष्काळाची तीव्रता वाढल्यास आहार पुरवठा खंडित होऊ नये म्हणून महिला व बालविकास, आरोग्य, पाणीपुरवठा आणि महसूल विभागाने परस्पर समन्वयाने काम करावे, अशा सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या. तसेच आहाराचा दर्जा, नियमित आरोग्य तपासणी व लसीकरणावर भर देऊन कुपोषण रोखण्यासाठी तातडीच्या उपाययोजना राबवण्याचे स्पष्ट केले. बैठकीस जिल्हा कार्यक्रम अधिकारी यांच्यासह संबंधित विविध विभागांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.













प्रतिक्रिया (०)
अद्याप प्रतिक्रिया नाहीत. पहिली प्रतिक्रिया तुम्हीच द्या!