बीड: जिल्ह्यातील तीव्र दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर पशुधनासाठी चारा टंचाईवर मात करण्यासाठी प्रशासनाने नाविन्यपूर्ण उपाययोजना हाती घेतली आहे. जलाशय, तलाव आणि धरणांमधील पाणीसाठा कमी झाल्याने उघड्यावर आलेल्या बुडीत क्षेत्रातील सुपीक गाळपेरा जमिनीवर चारा पिकांची लागवड करण्याबाबत आज जिल्हाधिकारी कार्यालयात विशेष आढावा बैठक पार पडली.

जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत पशुधनासाठी हिरव्या चाऱ्याची उपलब्धता वाढविण्यावर भर देण्यात आला. उपलब्ध जलस्रोतांच्या बुडीत क्षेत्रातील सुपीक जमिनीचा योग्य वापर करून चारा टंचाईची तीव्रता कमी करणे हा या उपक्रमाचा प्रमुख उद्देश आहे. या अंतर्गत जिल्ह्यातील उपलब्ध गाळपेरा क्षेत्राची माहिती संकलित करून त्या ठिकाणी चारा पिकांची लागवड करता येईल का याची शक्यता तपासली जाणार आहे. यासाठी योग्य चारा पिकांची निवड आणि संबंधित सर्व विभागांमध्ये समन्वय साधून प्रभावी अंमलबजावणी करण्याचे नियोजन बैठकीत करण्यात आले.

या बैठकीस जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितिन रहमान, अधीक्षक अभियंता पल्लवी जगताप, नखाते, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सुभाष साळवे आणि जिल्हा उपयुक्त पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय डॉ. कदम यांच्यासह संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.