बीड - प्रवासादरम्यान प्रवाशांचे दागिने आणि रोख रक्कम चोरणाऱ्या एका सराईत महिलेला बीड स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने शिताफीने ताब्यात घेतले आहे. शिवाजीनगर पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या चोरीच्या गुन्ह्याचा तपास करत असताना पोलिसांनी ही धडक कारवाई केली असून, संशयित महिलेकडून तब्बल १७ ग्रॅम सोन्याचे दागिने आणि रोख रक्कमेसह सुमारे अडीच लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

चोरी केलेले सोने विकण्यासाठी एक महिला बीड शहरातील गोरे वस्ती परिसरात येणार असल्याची गुप्त माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी तात्काळ सापळा रचून संबंधित महिलेला ताब्यात घेतले. पोलिसी खाक्या दाखवून चौकशी केली असता तिने प्रवासातील चोरीच्या गुन्ह्याची कबुली दिली. पुढील कायदेशीर कारवाईसाठी या महिलेला शिवाजीनगर पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे. बीडचे पोलीस अधीक्षक नवनीत काँवत, अपर पोलीस अधीक्षक समीर शेख आणि पोलीस उपअधीक्षक राजीव नवले यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ही कामगिरी यशस्वीरित्या पार पाडली.