बीड आणि अहिल्यानगर जिल्ह्याला जोडणाऱ्या मुख्य महामार्गावरील कानिफनाथ घाटात सोमवारी रात्रीच्या सुमारास एका पूर्ण वाढ झालेल्या बिबट्याचे दर्शन झाल्याने खळबळ उडाली आहे. आष्टी तालुक्यातील पिंपरी शिवारातील घाटात रात्री प्रवास करणाऱ्या एका कारचालकाने प्रसंगावधान राखत रस्त्यालगत वावरणाऱ्या या बिबट्याचा थरारक व्हिडिओ आपल्या मोबाईलमध्ये टिपला. हा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल झाल्यानंतर परिसरातील शेतकरी, पशुपालक आणि वाहनचालकांमध्ये मोठी भीती निर्माण झाली आहे.

कानिफनाथ घाटातून दररोज दुचाकी आणि चारचाकी वाहनांची मोठी वर्दळ असते. तसेच आजूबाजूला अनेक शेतवस्त्या आहेत. घाटात बिबट्या मुक्तपणे फिरताना दिसल्याने रात्रीच्या वेळी प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. या घटनेनंतर वन विभाग तात्काळ सतर्क झाला आहे. आष्टीचे वनपरिक्षेत्र अधिकारी अमोल मुंडे यांनी नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला असून, शेतकऱ्यांनी आपली पाळीव जनावरे उघड्यावर न बांधता सुरक्षित गोठ्यात बांधावीत असे आवाहन केले आहे. तसेच, दुचाकीस्वारांनी रात्री घाटातून प्रवास करताना विशेष काळजी घ्यावी आणि विनाकारण गाडी थांबवणे टाळावे, अशा सूचना वन विभागाने दिल्या आहेत.