Breaking

ओंकार शुगर्सने फिरवली पाठ; ऊस बिलापोटी शेतकऱ्यांची कोंडी, १ जूनपासून बेमुदत सत्याग्रहाचा इशारा

Updated: मे 27, 2026

By Vivek Sindhu

ओंकार शुगर्सने फिरवली पाठ; ऊस बिलापोटी शेतकऱ्यांची कोंडी, १ जूनपासून बेमुदत सत्याग्रहाचा इशारा

‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा

Join Channel

परळी तालुक्यातील पांगरी येथील ओंकार शुगर युनिट क्र. ८ प्रशासनाने मार्च अखेरपर्यंत गाळप झालेल्या ऊसाचे थकीत बिल जाहीर केलेल्या दरानुसार न देता शेतकऱ्यांची मोठी आर्थिक कोंडी आणि फसवणूक केली आहे. याविरोधात ऊस उत्पादक शेतकरी संघर्ष समितीच्या वतीने बुधवार, २७ मे रोजी कारखाना प्रशासनाला तीव्र निदर्शने करत निवेदन देण्यात आले. या महिन्याखेरपर्यंत जाहीर केलेल्या दरानुसार पूर्ण ऊस देयक शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर वर्ग न झाल्यास, येत्या १ जूनपासून कारखान्यासमोर बेमुदत सत्याग्रह आंदोलन करण्याचा थेट इशारा ऊस उत्पादक शेतकरी संघर्ष समितीचे ॲड. अजय बुरांडे यांनी दिला आहे.

कारखाना प्रशासनाने हंगाम सुरू होण्यापूर्वी ३०५० रुपये प्रति टन इतका जिल्ह्यातील सर्वाधिक दर जाहीर केला होता. त्यापैकी २९५० रुपये पहिला हप्ता व दिवाळीसाठी १०० रुपये देण्याचे ठरले होते. सुरुवातीच्या काही शेतकऱ्यांना हा दर मिळाला, मात्र नियमानुसार गाळपानंतर १५ दिवसांत बिल देणे बंधनकारक असताना कारखान्याने तब्बल ३ ते ४ महिने विलंब केला. यानंतर ८ मे रोजी शेतकऱ्यांनी केलेल्या आंदोलनानंतर प्रशासनाने २५ मे पर्यंत २९५० रुपयांच्या दराने संपूर्ण पैसे देण्याचे लेखी आश्वासन दिले होते. मात्र, प्रत्यक्षात केवळ १८०० रुपये प्रति टन इतकीच रक्कम वर्ग करण्यात आली, आणि तीही अद्याप सर्व शेतकऱ्यांना मिळालेली नाही. एकाच हंगामात दोन वेगवेगळे दर देऊन कारखाना प्रशासनाकडून ऊस उत्पादकांची निव्वळ दिशाभूल सुरू आहे.

या गंभीर परिस्थितीवर ऊस उत्पादक शेतकरी संघर्ष समितीचे ॲड. अजय बुरांडे यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. नियमानुसार ऊस उत्पादक शेतकऱ्यांना वेळेवर देयके अदा करण्याचे स्पष्ट आदेश असताना आणि राज्यातील ५४ साखर कारखान्यांवर साखर आयुक्तांनी कारवाईचा बडगा उगारला असताना, बीड जिल्ह्यातील कारखान्यांबाबत राज्य सरकार, साखर आयुक्त, जिल्हा प्रशासन आणि स्थानिक लोकप्रतिनिधी मूक गिळून गप्प का, असा परखड सवाल ॲड. बुरांडे यांनी उपस्थित केला आहे. जाहीर केलेल्या दरानुसार हक्काचे पैसे मिळेपर्यंत संघर्ष समिती मागे हटणार नाही, अशी ठाम भूमिका त्यांनी घेतली आहे. बुधवारच्या आंदोलनात ॲड. अजय बुरांडे यांच्यासह ॲड. श्रीनिवास मुंडे, कॉ. मुरलीधर नागरगोजे, हनुमंत सोळंके, कॉ. भगवान बडे, रघुनाथ दादा देशमुख यांसह परिसरातील शेकडो संतप्त शेतकरी उपस्थित होते.


Categories

Recent Posts