Breaking
Updated: मे 27, 2026
सावधान! उन्हाळी सुट्ट्यांमध्ये बंद घरे चोरट्यांच्या रडारवर
‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा
Join Channelअंबाजोगाई: उन्हाळी सुट्ट्या, जत्रा आणि इतर कारणांमुळे नागरिक मोठ्या प्रमाणावर बाहेरगावी जात असल्याच्या पार्श्वभूमीवर, अंबाजोगाई शहरात घरफोडी आणि चोऱ्यांच्या घटनांना आळा घालण्यासाठी अंबाजोगाई शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शरद जोगदंड यांनी नागरिकांना विशेष काळजी घेण्याचे जाहीर आवाहन केले आहे. सुट्ट्यांच्या काळात बंद घरांना लक्ष्य करून होणाऱ्या गुन्ह्यांचा धोका लक्षात घेता, पोलिसांनी नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी आणि मालमत्तेच्या रक्षणासाठी नियमावली जाहीर केली असून त्याचे काटेकोर पालन करण्याचे सूचित केले आहे.
नागरिकांनी बाहेरगावी जाताना घराला व्यवस्थित कुलूप लावावे आणि शक्य असल्यास डबल लॉकचा वापर करावा, असे आवाहन पोलिसांनी केले आहे. घर बंद राहणार असल्यास त्याची कल्पना विश्वासू शेजारी किंवा नातेवाईकांना देऊन त्यांच्यावर देखरेख ठेवण्याची जबाबदारी सोपवावी. तसेच, सोशल मीडियावर प्रवासाचे बेत किंवा ‘घर बंद आहे’ अशी माहिती पोस्ट करणे टाळावे, कारण यामुळे गुन्हेगारांना आयते निमंत्रण मिळू शकते. घरात मोठ्या प्रमाणात रोकड किंवा दागिने न ठेवता ते बँकेच्या लॉकरमध्ये सुरक्षित ठेवावेत आणि घर परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे व रात्रीच्या वेळी पुरेशा प्रकाशाची व्यवस्था करावी, असे पोलीस प्रशासनाने म्हटले आहे.
गुन्हेगारी कारवायांना प्रतिबंध करण्यासाठी नागरिकांनी अनोळखी व्यक्तींवर लक्ष ठेवावे. घरात कामगार, वॉचमन किंवा भाडेकरू ठेवताना त्यांची पोलीस पडताळणी करून घेणे अत्यंत आवश्यक आहे. प्रवासादरम्यान अनोळखी व्यक्तींकडून खाद्यपदार्थ स्वीकारू नयेत आणि बस, रेल्वेमध्ये आपल्या मौल्यवान वस्तूंची काळजी घ्यावी. कोणतीही संशयास्पद व्यक्ती किंवा हालचाल आढळून आल्यास त्वरित स्थानिक पोलीस स्टेशन किंवा ११२ या आपत्कालीन क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन पोलीस निरीक्षक शरद जोगदंड यांनी केले असून ‘सजग नागरिक, सुरक्षित समाज’ ही संकल्पना राबवून सुरक्षिततेची जबाबदारी सामूहिकपणे पार पाडण्याचे आवाहन केले आहे.