Breaking

बालन्यायालयातील जामिनाचा राग; मजुराला लोखंडी रॉडने मारहाण

Updated: मे 27, 2026

By Vivek Sindhu

बालन्यायालयातील जामिनाचा राग; मजुराला लोखंडी रॉडने मारहाण

‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा

Join Channel

केज तालुक्यातील मस्साजोग येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात २५ मे रोजी रात्री आठ वाजेच्या सुमारास एका मजुराला लोखंडी रॉडने बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. बालन्यायालयात आरोपीच्या नातेवाईकांची जामीन घेतल्याच्या कारणावरून ही कुरापत काढण्यात आली. या प्रकरणी जखमी मजूर अमोल भिवा सोनवणे यांच्या तक्रारीवरून केज पोलीस ठाण्यात अमित ऊर्फ शुभम दिलीप सोनवणे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून सहाय्यक फौजदार चव्हाण या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

फिर्यादी अमोल सोनवणे हे गावातील चौकात बसलेले असताना, आरोपी अमित याने तिथे येत तुझ्या वडिलांनी बालन्यायालय बीड येथे रितेश आणि शितेज सोनवणे यांची जामीन का घेतली, अशी विचारणा करून भांडणास सुरुवात केली. वाद वाढल्याने आरोपीने अमोल यांना अश्लील शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिली. याच दरम्यान आरोपीने हातातील लोखंडी रॉडने फिर्यादीच्या हाताच्या बोटांवर जोरदार प्रहार केला, ज्यामध्ये अमोल गंभीर जखमी झाले आहेत. पोलिसांनी या प्रकरणी भारतीय न्याय संहितेच्या कलम ११८(१), ३५२ आणि ३५१(२) अन्वये गुन्हा दाखल केला असून परिसरात शांतता राखण्याचे आवाहन केले आहे.


Categories

Recent Posts