Breaking

वकिलाची कोर्टात आत्महत्या प्रकरणी सुसाईड नोटवरून न्यायाधीशावर गुन्हा

Updated: ऑगस्ट 22, 2025

By Vivek Sindhu

वकिलाची कोर्टात आत्महत्या प्रकरणी सुसाईड नोटवरून न्यायाधीशावर गुन्हा

‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा

Join Channel

बीड – बीड जिल्ह्यातील एका सरकारी वकिलाने कोर्टात केलेल्या आत्महत्येविषयी एक नवी अपडेट समोर आली आहे. या प्रकरणी वडवणी न्यायालयाच्या न्यायाधीशावरच गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींना आरोपीच्या पिंजऱ्यात उभे राहण्याचे फर्मान सोडणाऱ्या न्यायाधीशावरच या प्रकरणी आरोपीच्या पिंजऱ्यात उभे राहण्याची वेळ आल्यामुळे राज्याच्या न्याय वर्तुळात एकच खळबळ माजली आहे.
यासंबंधीच्या माहितीनुसार, वडवणी न्यायालयातील सरकारी वकील विनायक चंदेल यांनी दोन दिवसांपूर्वी न्यायालयातच गळफास घेऊन आत्महत्या केली होती. पोलिसांना घटनास्थळी एक सुसाईड नोट सापडली होती. या सुसाईड नोटच्या आधारावर व कुटुंबीयांनी दिलेल्या फिर्यादीवरून वडवमी न्यायालयाचे न्यायाधीश रफीक शेख व इतर एका आरोपीवर वडवणी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विनायक चंदेल यांचा मुलगा विश्वजीत चंदेल यांच्या फिर्यादीवरून ही कारवाई करण्यात आली आहे. न्यायाधीश रफीक शेख व एका कर्मचाऱ्याकडून विनायक यांना वारंवार त्रास दिला जात होता. या त्रासाला कंटाळून त्यांनी सत्काराच्या शालीने कोर्टात गळफास लावून आत्महत्या केली, असे यासंबंधीच्या तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. पीडित कुटुंबीयांनी या प्रकरणी न्यायाचीही मागणी केली आहे.
उल्लेखनीय बाब म्हणजे लाच घेण्याच्या प्रकरणात न्यायाधीशांवर गुन्हा दाखल होण्याच्या घटना यापूर्वी अनेकदा घडल्यात. पण आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी एखाद्या जजवर गुन्हा दाखल होण्याची ही कदाचित पहिलीच वेळ आहे. काही महिन्यांपूर्वी साताऱ्यातील एका न्यायाधीशावर लाच घेतल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला होता. त्यानंतर आता वडवणी येथील न्यायाधीशावर मृत्यूस कारणीभूत असल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामुळे न्यायालयीन वर्तुळात एकच खळबळ माजली आहे. ‘एबीपी माझा’च्या वृत्तानुसार, या घटनेनंतर संबंधित न्यायाधीशाने आपल्या पदाचा राजीनामा दिल्याचीही माहिती आहे. पोलिस आता त्यांचा शोध घेत आहेत.
दुसरीकडे, बीडच्या गेवराई तालुक्यात लव्ह ट्रँगलमधून एका तरुणीने आपल्या होमगार्ड मैत्रिणीची हत्या केल्याची खळबळजनक घटना उजेडात आली आहे. पोलिसांनी या प्रकरणी 4 जणांना अटक केली आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, अयोध्या राहुल व्हरकटे (26) असे मृत विवाहित तरुणीचे नाव होते. अयोध्या लुखामसला (ता. गेवराई) येथे राहत होती. 4 वर्षांपूर्वी तिचे पती अपघातात वारले होते. त्यामुळे ती तिच्या 3 वर्षांच्या मुलीसोबत राहत होती. अयोध्या नुकतीच होमगार्डमध्ये भरती झाली होती. अयोध्याची मैत्रीण फडताडे हिचे राठोड नामक एका तरुणावर प्रेम होते. पण काही दिवसांपासून राठोड आणि अयोध्याची जवळीक वाढली. त्यामुळे फडताडेला राग आला आणि याच रागातून तिने अयोध्याला मारण्याचा प्लॅन बनवला.
दोन दिवसांपूर्वी फडताडे हिने अयोध्याला घरी बोलावले. तिथे मुलाच्या मदतीने तिने अयोध्याचा गळा दाबून खून केला. नंतर त्यांनी मृतदेह लपवण्याचा प्लॅन केला. फडताडेच्या मुलाने एका ओळखीच्या माणसाकडून स्कूटी घेतली आणि त्या स्कूटीवरून त्यांनी मृतदेह एका खोक्यात टाकला. नंतर हा मृतदेह बीड शहराजवळील नाल्यात फेकून देण्यात आला होता. गुरुवारी सकाळी काही लोकांना तो मृतदेह दिसला. स्थानिकांनी लगेच याबाबतची माहिती पोलिसांना दिली. त्यानंतर पोलिसांनी तपास करून आरोपी फडताडे, तिचा मुलगा व इतर दोघांना अटक केली. या हत्याकांडामुळे जिल्ह्यात एकच खळबळ माजली आहे.


Categories

Recent Posts