Breaking
Updated: एप्रिल 29, 2026
‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा
Join Channelमाजलगाव: शहरात २१ एप्रिल २०२६ रोजी एका अल्पवयीन मुलीवर झालेल्या अत्याचार प्रकरणात पोलिसांनी तपासाअंती गुन्ह्याची व्याप्ती वाढवत अधिक गंभीर कलमे लागू केली आहेत. या प्रकरणातील विधीसंघर्षग्रस्त बालकाची रवानगी बीड येथील निरीक्षण गृहात करण्यात आली असून, पीडितेच्या सविस्तर जबाबानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. महत्त्वाचे म्हणजे, या गुन्ह्यात सक्तीने धर्मपरिवर्तन झाल्याचे कोणतेही पुरावे आतापर्यंतच्या तपासात आढळले नसल्याचे पोलिसांनी अधिकृतरीत्या स्पष्ट केले आहे.
सहाय्यक पोलीस निरीक्षक महेश भोसले यांनी दिलेल्या माहितीनुसार, माजलगाव शहर पोलीस ठाण्यात नोंदवलेल्या गुन्हा रजिस्टर क्रमांक १२२/२६ मध्ये सुरुवातीला भारतीय न्याय संहितेच्या कलम ७४, ७५, ७९ आणि पोक्सो कायद्याच्या कलम ८, १२ नुसार कारवाई करण्यात आली होती. मात्र, पिंक पथकाने केलेल्या सखोल तपासानंतर आणि पीडितेच्या नव्या जबाबामुळे आता या गुन्ह्यात कलम ६४(२)(एम), ६५, ३०८ आणि ३५१(२) बीएनएस सह पोक्सो कायद्याच्या कलम ४ व ६ या अत्यंत गंभीर कलमांचा समावेश करण्यात आला आहे. सध्या या प्रकरणाचा तांत्रिक आणि इतर पुराव्यांच्या आधारे तपास सुरू आहे.
पोलीस तपासात सक्तीने धर्मांतर झाल्याचा दावा सिद्ध करणारा कोणताही पुरावा अद्याप मिळालेला नाही. त्यामुळे नागरिकांनी या प्रकरणाबाबत कोणत्याही सोशल मीडियावरील अफवांना बळी पडू नये, असे आवाहन बीड जिल्हा पोलिसांच्या वतीने करण्यात आले आहे. तपासात काही नवीन बाबी निष्पन्न झाल्यास त्या जनतेसमोर आणल्या जातील, तोपर्यंत शांतता राखण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.