Breaking

‘आधार माणुसकीचा’ उपक्रमातून चार गरजू विद्यार्थी बनले डॉक्टर: आई-वडिलांच्या कष्टाचे झाले चिज

Updated: एप्रिल 30, 2026

By Vivek Sindhu

'आधार माणुसकीचा' उपक्रमातून चार गरजू विद्यार्थी बनले डॉक्टर: आई-वडिलांच्या कष्टाचे झाले चिज

‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा

Join Channel

अंबाजोगाई: कौटुंबिक संघर्षावर मात करत आणि ‘आधार माणुसकीचा’ उपक्रमाच्या मदतीने चार जिद्दी विद्यार्थ्यांनी वैद्यकीय शिक्षणाचे शिखर सर केले आहे. लातूर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून एमबीबीएसचे शिक्षण पूर्ण केलेल्या डॉ. माधवी आघाव, डॉ. आसावरी गोरे, डॉ. परमेश्वर आगवाने आणि डॉ. दीपक देवठाणे यांना नुकतीच वैद्यकीय पदवी प्रदान करण्यात आली. प्रतिकूल परिस्थितीत आई-वडिलांनी घेतलेल्या कष्टाचे चीज करत या विद्यार्थ्यांनी आपले स्वप्न सत्यात उतरवले असून, नांदेड येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. सुधीर देशमुख यांच्या हस्ते त्यांना ही पदवी बहाल करण्यात आली.

या यशात ॲड. संतोष पवार यांच्या ‘आधार माणुसकीचा’ या उपक्रमाचा मोलाचा वाटा आहे. ठाणे येथील विद्यार्थी विकास योजनेच्या माध्यमातून या गुणवंत विद्यार्थ्यांना वैद्यकीय शिक्षणासाठी आवश्यक असलेले आर्थिक पाठबळ उपलब्ध करून देण्यात आले होते. परळीची माधवी आघाव, नायगावची आसावरी गोरे आणि बुलढाण्याचे परमेश्वर आगवाने व दीपक देवठाणे यांनी आपला हा प्रवास अत्यंत खडतर परिस्थितीतून पूर्ण केला आहे. पदवी प्रदान समारंभाला स्वतः ॲड. संतोष पवार यांनी उपस्थित राहून या भावी डॉक्टरांचे कौतुक केले.

गेल्या नऊ वर्षांपासून ॲड. संतोष पवार हे वडिलांचे छत्र हरवलेल्या आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल असलेल्या शेकडो विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचे कार्य निरंतर करत आहेत. केवळ पदवी मिळवणे हाच या विद्यार्थ्यांचा उद्देश नसून, भविष्यात समाजातील गोरगरीब रुग्णांची निष्ठेने सेवा करण्यासाठी आपण कटिबद्ध असल्याचे या नवनियुक्त डॉक्टरांनी यावेळी आवर्जून सांगितले. सामान्यांच्या घरातून जिद्दीच्या जोरावर डॉक्टर घडवण्याच्या या यशस्वी प्रयोगाचे सध्या सर्वत्र कौतुक होत आहे.


Categories

Recent Posts