Breaking

बीडच्या विद्यार्थ्याची पुण्यात आत्महत्या; पुण्यातील ॲकॅडमीच्या संस्थापकासह तिघांवर गुन्हा दाखल

Updated: एप्रिल 19, 2026

By Vivek Sindhu

Picsart 26 04 19 20 52 55 008

‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा

Join Channel

बीड / पुणे:  पुणे शहरातील हांडेवाडी परिसरात असलेल्या यशोतेज ॲकॅडमीच्या निवासी खोलीत मूळचा बीड येथील रहिवासी असलेला १६ वर्षीय विद्यार्थी अवधूत उल्हास बडे याने १० नोव्हेंबर २०२५ रोजी गळफास घेऊन आत्महत्या केली होती. या प्रकरणी सुरुवातीला आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली होती, मात्र पोलीस तपासात ही आत्महत्या नैराश्यातून आणि संस्थेच्या हलगर्जीपणामुळे झाल्याचे निष्पन्न झाले आहे. अखेर पाच महिन्यानंतर फुरसुंगी पोलिसांनी ॲकॅडमीचे संस्थापक, सीईओ आणि वॉर्डन यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

अवधूत बडे हा बीड शहरातील आनंद नगर येथील रहिवासी होता. त्याचे आई-वडील दोघेही शिक्षक असून त्याने एनडीए परीक्षेच्या तयारीसाठी यशोतेज ॲकॅडमीत प्रवेश घेतला होता. १० नोव्हेंबर रोजी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास अवधूतने रूम नंबर ५१३ मध्ये छताच्या पंख्याला बेडशीटच्या साहाय्याने गळफास लावून आपले जीवन संपवले. या घटनेनंतर त्याचे वडील उल्हास म्हातारदेव बडे यांनी दिलेल्या तक्रारीवरून हा गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

तपासातून समोर आलेल्या माहितीनुसार, अवधूतवर त्याच्या रूममेटचे तीन हजार रुपये चोरी केल्याचा आरोप करण्यात आला होता. यावरून वॉर्डन वसंत तुकाराम सरकटे यांनी अवधूतला ॲकॅडमीतून काढून टाकण्याची (रस्टीकेट) धमकी दिली होती. या मानसिक दबावामुळे आणि भीतीपोटी अवधूत नैराश्यात गेला होता. महत्त्वाचे म्हणजे, अवधूत अल्पवयीन असतानाही अशा परिस्थितीत त्याचे योग्य समुपदेशन करण्यात आले नाही. तसेच, घडलेल्या प्रकाराची माहिती त्याच्या पालकांनाही वेळेत देण्यात आली नाही असा ठपका फिर्यादीत ठेवण्यात आला आहे.

या प्रकरणी ॲकॅडमीचे संस्थापक व संचालक तेजस पद्माकर पाटील, सीईओ विकास सुरेश पाटील आणि वॉर्डन वसंत तुकाराम सरकटे यांच्यावर भारतीय न्याय संहिता कलम १०६ आणि ३(५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी आपल्या कर्तव्यात हलगर्जीपणा केल्यामुळे एका निष्पाप विद्यार्थ्याला जीव गमवावा लागल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. फुरसुंगी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अमोल मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक शंभुराज जाधव या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.


Categories

Recent Posts