Breaking
Updated: एप्रिल 17, 2026
; दुचाकी आणि कत्ती जप्त
‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा
Join Channelपाटोदा: बीड जिल्ह्यातील पाटोदा तालुक्यातील अंमळनेर येथे पोलिसांनी राबवलेल्या ‘ऑल आऊट ऑपरेशन’ दरम्यान एका संशयित इसमाला धारदार शस्त्रासह ताब्यात घेण्यात आले आहे. ही कारवाई १७ एप्रिल २०२६ रोजी पहाटे दोन वाजेच्या सुमारास अंमळनेर येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात करण्यात आली.
या प्रकरणी पोलीस अंमलदार बाळासाहेब शिंदे यांनी सरकारतर्फे फिर्याद दिली आहे. त्यांच्या तक्रारीनुसार, अंमळनेर पोलीस ठाण्याचे पथक शिवाजी महाराज चौकात नाकाबंदी करत असताना पिंपळवंडीकडून एक दुचाकीस्वार येत होता. संशयावरून पोलिसांनी त्याला अडवून त्याची चौकशी केली असता त्याने आपले नाव अशोक गहिनीनाथ सुळे (वय ४२, रा. निवडुंगा, ता. पाटोदा) असल्याचे सांगितले. पोलिसांनी त्याच्या काळ्या रंगाच्या हिरो स्प्लेंडर दुचाकीच्या (क्रमांक MH 23 S 1463) साईड बॅगची झडती घेतली असता, त्यात एक विनापरवाना धारदार शस्त्र मिळून आले.
कारवाई दरम्यान पोलिसांनी २०० रुपये किमतीची ४८ सेंटीमीटर लांबीची लोखंडी कत्ती आणि २० हजार रुपयांची दुचाकी असा एकूण २० हजार २०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी अंमळनेर पोलीस ठाण्यात आरोपी अशोक सुळे याच्याविरुद्ध शस्त्र अधिनियमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पोलीस उपनिरीक्षक चव्हाण, सहाय्यक पोलीस फौजदार राठोड आणि पोलीस अंमलदार बहिरवाळ यांच्या पथकाने केली. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हवालदार मारोती मेहत्रे करत आहेत.