Breaking
Updated: एप्रिल 17, 2026
परळी वैजनाथ येथील हृदयद्रावक घटना
‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा
Join Channelपरळी – परळी वैजनाथ रेल्वे स्थानकावर कर्तव्य बजावणाऱ्या नितीन पंडित ढगे या तरुण पोलीस जवानाने शुक्रवारी सकाळी गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली. अवघ्या काही दिवसांवर लग्न येऊन ठेपले असताना घडलेल्या या धक्कादायक घटनेमुळे संपूर्ण परिसरात आणि पोलीस दलात मोठी हळहळ व्यक्त होत आहे. धाराशिव जिल्ह्यातील लोहारा येथील रहिवासी असलेल्या नितीन यांनी परळीतील माधवबाग परिसरातील एका ‘प्ले रूम’मध्ये टोकाचे पाऊल उचलले असून, त्यांच्या आत्महत्येचे निश्चित कारण अद्याप समोर आलेले नाही.
मिळालेल्या माहितीनुसार, नितीन ढगे हे सप्टेंबर २०२४ मध्ये लोहमार्ग पोलीस दलात (जीआरपी) भरती झाले होते. सध्या ते परळी वैजनाथ येथे कार्यरत होते. आज १७ एप्रिल रोजी सकाळी ही घटना उघडकीस येताच स्थानिक पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. कर्तव्यावर असताना एका तरुण सहकाऱ्याने अशा प्रकारे जीवन संपवल्याने सहकारी कर्मचाऱ्यांमध्येही दुःखाचे वातावरण आहे.
या घटनेतील सर्वात क्लेशदायक बाब म्हणजे नितीन यांचा विवाह अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला होता. येत्या ७ मे रोजी त्यांचा विवाह संपन्न होणार होता आणि काही दिवसांपूर्वीच त्यांचा साखरपुडा मोठ्या उत्साहात पार पडला होता. दोन्ही कुटुंबांमध्ये लग्नाची लगबग आणि आनंदाचे वातावरण असतानाच, नितीन यांनी अचानक हे टोकाचे पाऊल का उचलले, याचे गुढ कायम आहे. पोलीस या प्रकरणाचा सर्व बाजूंनी सखोल तपास करत आहेत.