बीड शहरातील सिध्देश्वर नगर (बहिरवाडी) भागात शेतीच्या कामाचा बहाणा करून एका ३७ वर्षीय वकिलाला घराबाहेर बोलावून घेत टोळक्याने लोखंडी रॉड आणि लाकडी दांड्याने बेदम मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. १५ ऑक्टोबर रोजी रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास ही प्राणघातक मारहाण झाली असून, पेठ बीड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दिनेश दत्तात्रय नाटकर हे व्यवसायाने वकील आहेत. आरोपी उत्कर्ष मोमीन, जय लोंढे, यश बावणे आणि त्यांच्या इतर चार-पाच अनोळखी साथीदारांनी 'शेतीचे काम आहे' असे सांगून दिनेश यांना घराबाहेर बोलावले. घरापासून काही अंतरावर नेऊन 'तू लय माजलास का' असे म्हणत त्यांना लाथाबुक्क्यांनी, लोखंडी रॉडने आणि लाकडी दांड्याने डोक्यात आणि उजव्या डोळ्यावर मारहाण केली. तसेच 'पोलिसांत तक्रार केलीस तर बलात्काराचा किंवा अ‍ॅट्रॉसिटीचा खोटा गुन्हा दाखल करू' अशी धमकीही दिली. याप्रकरणी दिनेश नाटकर यांच्या फिर्यादीवरून पेठ बीड पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पोलीस हवालदार भोले तपास करत आहेत.