अंबाजोगाई तालुक्यातील सोनहिवरा फाट्यावर भरदिवसा एका दारुड्याने 'तू माझ्या मामाला का बोललीस' या क्षुल्लक कारणावरून एका ४५ वर्षीय महिलेला बेदम मारहाण करत तिच्या डोक्यात दगड घालून रक्तबंबाळ केल्याची संतापजनक घटना घडली आहे. १७ ऑक्टोबर रोजी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास हा धक्कादायक प्रकार घडला असून, याप्रकरणी अंबाजोगाई ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जिजाबाई त्र्यंबक मुंडे (वय ४५, रा. सोनहिवरा) या कामानिमित्त सोनहिवरा फाट्यावर आल्या असताना गावातीलच दिलीप बाबूराव मुंडे हा तिथे दारूच्या नशेत तर्र होऊन आला. त्याने जिजाबाई यांच्याशी विनाकारण हुज्जत घालत 'तू माझा मामा बालासाहेब मुंडे याला का बोललीस' असा जाब विचारला. त्यानंतर त्याने थेट जिजाबाई यांच्या श्रीमुखात भडकावून शिवीगाळ सुरू केली. रागाच्या भरात दिलीप याने रस्त्यावरील दगड उचलून त्यांच्या डोक्यात जोरदार मारला, ज्यामुळे त्या गंभीर जखमी झाल्या. या भ्याड हल्ल्यानंतर जिजाबाई यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अंबाजोगाई ग्रामीण पोलिसांनी दिलीप मुंडे याच्यावर गुन्हा नोंदवला असून पोलीस हवालदार बासर या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.