अंबाजोगाई : महामानवांच्या समतावादी, मानवतावादी व प्रबोधनपर विचारांचा जागर करण्यासाठी बुद्धिस्ट फाऊंडेशन ऑफ इंडियाच्या वतीने धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त ६ व्या राज्यस्तरीय धम्म महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. मांडवा रोडवरील लुंबिनी पार्क येथील नियोजित विश्वशांती महाविहार येथे रविवार, २५ ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी १० ते सायंकाळी ६ या वेळेत हा सोहळा पार पडेल. या महोत्सवाचे उद्घाटन सोलापूरच्या खासदार प्रणिती शिंदे यांच्या हस्ते होणार असून, युवा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे प्रदेशाध्यक्ष पप्पू कागदे अध्यक्षस्थानी असतील. याप्रसंगी विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांना राज्यस्तरीय पुरस्कारांनी सन्मानित केले जाणार आहे.
चार प्रबोधनपर सत्रांची आखणी
एकूण चार सत्रांत हा महोत्सव संपन्न होणार असून पहिल्या सत्रात सकाळी विनामूल्य खुली कराओके गीत गायन स्पर्धा रंगणार आहे. दुसऱ्या सत्रात धम्म ध्वजारोहण, उद्घाटन आणि मान्यवरांच्या हस्ते राज्यस्तरीय पुरस्कारांचे वितरण पार पडेल. तिसऱ्या सत्रात हिंगोलीच्या पूजनीय भिक्खुणी रूपनंदा आणि बीडचे पूज्य भन्ते धम्मशिल महाथेरो यांची धम्मदेसना होणार आहे. तर चौथ्या सत्रात प्रा. डॉ. मकरंद जोगदंड यांच्या अध्यक्षतेखाली गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार आणि प्रख्यात विचारवंत डॉ. सुरेश माने यांचे विशेष व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे.
राज्यस्तरीय पुरस्कारांचे मानकरी
संस्थेतर्फे यंदाच्या राज्यस्तरीय पुरस्कारांची घोषणा करण्यात आली असून यामध्ये रोहिदास बनसोडे (धम्ममित्र पुरस्कार), रोहिदास हातागळे (पत्रकारिता पुरस्कार), भास्कर घाडगे (उद्योगभूषण पुरस्कार), सिद्धार्थ शिनगारे (समाजसेवा पुरस्कार), रमाबाई रणवीर (शौर्य पुरस्कार) आणि सतीश कांबळे (विद्याभूषण पुरस्कार) यांना मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात येणार आहे.
विविध क्षेत्रांतील मान्यवरांची मांदियाळी
या सोहळ्यास माजी खासदार प्रा. जोगेंद्र कवाडे, खासदार बजरंग सोनवणे, आमदार नमिता मुंदडा, नगराध्यक्ष नंदकिशोर मुंदडा, राजकिशोर मोदी, संजय वाघमारे, डॉ. सुरेश शेळके, भीमसेन लोमटे, गौतम मुंढे, ॲड. अनंतराव जगतकर, प्रा. एस. के. जोगदंड आणि चंद्रशेखर वडमारे यांच्यासह अनेक राजकीय, सामाजिक क्षेत्रांतील नेते उपस्थित राहणार आहेत. हा महोत्सव नव्या पिढीला प्रेरणा देणारा व सामाजिक ऐक्य दृढ करणारा ठरेल, असा विश्वास सचिव डॉ. कमलाकर कांबळे यांनी व्यक्त केला असून प्रमुख संयोजक प्रा. डी. जी. धाकडे यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी नागरिकांना सहकुटुंब उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.













प्रतिक्रिया (०)
अद्याप प्रतिक्रिया नाहीत. पहिली प्रतिक्रिया तुम्हीच द्या!