अंबाजोगाई : महाराष्ट्राचे प्रमुख शक्तिपीठ व लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री योगेश्वरी देवीच्या नवरात्र महोत्सवाची सांगता विजयादशमीच्या शुभमुहूर्तावर सीमोल्लंघन सोहळ्याने उत्साहात झाली. मंगळवारी सायंकाळी पारंपरिक वाद्यांचा गजर, फटाक्यांची आतषबाजी आणि 'आई राजा उदो उदो, सदानंदीचा उदो उदो' या जयघोषात फुलांनी सजवलेली श्रींची पालखी सीमोल्लंघनासाठी मार्गस्थ झाली. या सोहळ्यात हजारो भाविकांनी सहभागी होऊन देवीच्या पालखीचे मनोभावे दर्शन घेतले. पालखी निघण्यापूर्वी देवल कमिटीचे अध्यक्ष तथा तहसीलदार विलास तरंगे यांनी सपत्निक पालखीचे विधिवत पूजन केले.

पारंपरिक वाद्यांचा गजर आणि स्वागत

नियोजित मार्गाने निघालेल्या या पालखी मिरवणुकीत ढोल-ताशा, बँड पथक, झांज, संबळ आणि आराधी मेळे यांच्या निनादाने संपूर्ण परिसर भक्तिमय झाला होता. भाविकांनी पालखी मार्गावर आकर्षक रांगोळ्या काढून ठिकठिकाणी पुष्पवृष्टी करत देवीचे स्वागत केले. सीमोल्लंघनानंतर पालखी परंपरेनुसार रात्री उशिरा मंदिरात परतली.

२५ वर्षांची समाजसेवेची परंपरा

पालखीचे रविवार पेठेत आगमन झाले असता स्व. प्रेमचंदजी कुंकुलोळ ट्रस्ट व रविवार पेठ मित्रमंडळाच्या वतीने उपस्थित आराधी महिला व पुरुषांना फराळाचे वाटप करण्यात आले. अंबाजोगाईचे भूमिपुत्र तथा उद्योजक संतोष कुंकुलोळ यांच्या माध्यमातून ही सामाजिक परंपरा सलग २५ वर्षांपासून अविरत सुरू आहे. याप्रसंगी कुंकुलोळ परिवारातील सदस्यांसह भारतीय जैन संघटनेचे पदाधिकारी, रविवार पेठ मित्रमंडळाचे कार्यकर्ते आणि परिसरातील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.