अंबाजोगाई - मराठवाडा पदवीधर मतदारसंघातील महायुतीचे अधिकृत उमेदवार आमदार सतीश चव्हाण हे सलग तीन टर्म लोकप्रतिनिधी म्हणून कार्यरत असून त्यांना पदवीधर, शिक्षक आणि सर्वसामान्यांच्या प्रश्नांची सखोल जाण आहे. महायुतीचे खंदे शिलेदार म्हणून त्यांना पुन्हा चौथ्यांदा विधानपरिषदेवर प्रचंड बहुमताने पाठवावे, असे आवाहन माजी मंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आमदार धनंजय मुंडे यांनी केले.

अंबाजोगाई येथे माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि ज्येष्ठ नेते तथा नगराध्यक्ष नंदकिशोर मुंदडा यांच्या अध्यक्षतेखाली महायुतीचा भव्य पदवीधर मेळावा उत्साहात संपन्न झाला. त्याप्रसंगी मुंडे बोलत होते.

विधानपरिषदेतील अभ्यासू नेतृत्व : धनंजय मुंडे

सतीश चव्हाण यांच्या कार्यशैलीचे कौतुक करताना धनंजय मुंडे म्हणाले, "विधानपरिषदेमध्ये सतीश भाऊ आणि विक्रम काळे हे दोघे आमच्या टीमचे 'ओपनिंग बॅट्समन' आहेत. कमीत कमी शब्दांत प्रभावीपणे मुद्दे मांडून जनसामान्यांचे प्रश्न सोडवण्यात त्यांचा हातखंडा आहे. मराठवाड्यातील सुशिक्षित पदवीधर पुन्हा एकदा त्यांच्यावर पूर्ण विश्वास दाखवून त्यांना विक्रमी मताधिक्याने विजयी करतील."

महायुतीचा विजय निश्चित : नंदकिशोर मुंदडा व आ. नमिता मुंदडा

कार्यक्रमाचे अध्यक्ष नंदकिशोर मुंदडा म्हणाले की, सतीश चव्हाण यांच्या पाठीशी भारतीय जनता पक्षासह संपूर्ण केज मतदारसंघातील महायुतीची ताकद ठामपणे उभी असून त्यांचा विजय निश्चित आहे. आमदार नमिता मुंदडा यांनी सांगितले की, सतीश चव्हाण यांच्या दीर्घ अनुभवाचा फायदा पदवीधर आणि शिक्षकांच्या समस्या सोडवण्यासाठी सातत्याने झाला आहे. त्यामुळे ते सलग चौथ्यांदा विधानपरिषदेत प्रतिनिधित्व करतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. यावेळी आमदार विक्रम काळे यांनी उपस्थितांना पदवीधर मतदानाची अचूक पद्धत समजावून सांगितली.

व्यासपीठावर महायुतीच्या दिग्गज नेत्यांची उपस्थिती

या मेळाव्याला आमदार विक्रम काळे, आमदार नमिता मुंदडा, माजी आमदार संजय दौंड, भाजप प्रवक्ते राम कुलकर्णी, राजकिशोर मोदी, मकरंद पत्की, दत्ता पाटील, राजपाल लोमटे, रिपाइंचे महेंद्र निकाळजे, बबन लोमटे, शिवसेनेचे ऋषिकेश लोमटे, राजाभाऊ औताडे, शिवाजी शिरसाट, बाळासाहेब शेप, भगवान केदार, नाना भगत, गोकुळ कदम, जयसिंग चव्हाण, कमलाकर कोपले, हिंदूलाल काकडे, दिनेश भराडीया, अजितराव देशमुख, विलास सोनवणे, शिवाजीराव घोगरे, बिभीषण फड, विजयकुमार नागरगोजे, सय्यद ताहेर, संजय गंभीरे, लक्ष्मण करणार, रणजीत लोमटे, तानाजी देशमुख, संजीवनी देशमुख व गणेश देशमुख यांच्यासह महायुतीचे पदाधिकारी व पदवीधर मतदार मोठ्या संख्येने उपस्थित होते.