Breaking

अंबाजोगाईच्या छत्रपती संभाजी राजे ग्लोबल स्कूलचे सीबीएसई परीक्षेत देदीप्यमान यश

Updated: एप्रिल 18, 2026

By Vivek Sindhu

गुणवंत विद्यार्थ्यांचा थाटात गौरव

‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा

Join Channel

गुणवंत विद्यार्थ्यांचा थाटात गौरव

अंबाजोगाई येथील जय भारती बहुउद्देशीय सेवाभावी प्रतिष्ठान संचलित छत्रपती संभाजी राजे ग्लोबल स्कूल अँड ज्युनिअर कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी सीबीएसई बोर्डाच्या दहावीच्या परीक्षेत आपल्या यशाची परंपरा कायम राखली आहे. नुकत्याच जाहीर झालेल्या या निकालात शाळेचा निकाल शंभर टक्के लागला असून एकूण ५१ विद्यार्थ्यांपैकी ११ विद्यार्थ्यांनी ९० टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळवून घवघवीत यश संपादन केले आहे. या देदीप्यमान यशाबद्दल शाळेच्या वतीने आयोजित एका विशेष सोहळ्यात गुणवंत विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला.

यंदाच्या परीक्षेत स्वराज बाबासाहेब चौधरी याने ९८.२ टक्के गुण मिळवून शाळेत प्रथम येण्याचा बहुमान पटकावला. त्याच्या पाठोपाठ साई महेश सूर्यवंशी याने ९५.६ टक्के आणि विश्वजीत बाळासाहेब थोरात याने ९५ टक्के गुण मिळवून अनुक्रमे द्वितीय व तृतीय क्रमांक मिळवला. केवळ अव्वल तीनच नव्हे तर शाळेतील १५ विद्यार्थ्यांनी ८० ते ९० टक्क्यांच्या श्रेणीत स्थान मिळवत शाळेच्या शैक्षणिक गुणवत्तेचा दर्जा पुन्हा एकदा सिद्ध केला आहे. विविध विषयांमध्ये पैकीच्या पैकी गुण मिळवत या विद्यार्थ्यांनी अंबाजोगाईच्या शैक्षणिक क्षेत्रात शाळेचा नावलौकिक वाढवला आहे.

या सोहळ्यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून एसआरटी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील श्वसन औषधशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. अनिल मस्के, ज्येष्ठ पत्रकार अविनाश मुडेगावकर आणि आधार माणुसकीचा या संस्थेचे अध्यक्ष ॲड. संतोष पवार यांची उपस्थिती होती. तसेच शाळेचे संचालक डॉ. ॲड. माधव जाधव, जे. डी. थोरात आणि ॲड. अनिल लोमटे यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी बोलताना डॉ. अनिल मस्के आणि ॲड. संतोष पवार यांनी विद्यार्थ्यांच्या कठोर परिश्रमाचे कौतुक करत त्यांना उज्ज्वल भविष्यासाठी आणि करिअरच्या निवडीसाठी अनमोल मार्गदर्शन केले.

कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भूषवताना शाळेचे अध्यक्ष डॉ. ॲड. माधव जाधव यांनी सांगितले की, शाळेने सुरुवातीपासूनच शंभर टक्के निकालाची परंपरा जपली असून शैक्षणिक क्षेत्रात आपला वेगळा ठसा उमटवला आहे. विद्यार्थ्यांनी आपल्या मनोगतातून या यशाचे सर्व श्रेय शाळेतील शिस्तबद्ध वातावरण, शिक्षकांचे अहोरात्र कष्ट आणि पालकांच्या खंबीर पाठिंब्याला दिले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्या शशिकला गंगणे यांनी केले तर ईशरत मोमीन आणि मेघना मॅडम यांनी प्रभावी सूत्रसंचालन केले. शाळेचे व्यवस्थापन, प्राचार्य आणि सर्व शिक्षकांनी विद्यार्थ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन करत त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.


Categories

Recent Posts