Breaking

संजयनगरमधील मावा कारखान्यावर पोलिसांचा छापा; २ लाख १२ हजारांचा मुद्देमाल जप्त, एकास अटक

Updated: एप्रिल 18, 2026

By Vivek Sindhu

२ लाख १२ हजारांचा मुद्देमाल जप्त, एकास अटक

‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा

Join Channel

गेवराई: गेवराई पोलिसांनी शहरातील संजयनगर भागात एका छुप्या मावा कारखान्यावर धाड टाकून मोठी कारवाई केली आहे. या धाडीत मानवी शरीरास अपायकारक असणारा सुगंधित तंबाखू, मावा आणि तो तयार करण्याचे साहित्य असा एकूण २ लाख १२ हजार ७०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

जिल्ह्यात अवैध गुटखा विक्री रोखण्यासाठी पोलीस अधीक्षक नवनीत काँवत यांनी दिलेल्या आदेशांनुसार पोलीस पथके सतर्क होती. १८ एप्रिल २०२६ रोजी गेवराई पोलीस ठाण्याला गोपनीय माहिती मिळाली की, जावेद निजाम शेख (वय ३८, रा. संजयनगर, गेवराई) हा आपल्या घरासमोरील एका खोलीत महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधित असलेला सुगंधित तंबाखू वापरून मावा तयार करत आहे आणि त्याची विक्री करत आहे. या खात्रीशीर माहितीच्या आधारे पोलिसांनी संजयनगर परिसरात छापा टाकला.

पोलिसांनी केलेल्या या झडतीमध्ये त्यांना सुगंधित तंबाखू, सुपारी, तयार केलेला मावा, मिक्सर आणि मावा तयार करण्यासाठी वापरली जाणारी मोठी लोखंडी मशीन व इतर साहित्य मिळून आले. एफएसएल (FSL) पथकाच्या उपस्थितीत हा सर्व मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला. या प्रकरणी अन्न सुरक्षा अधिकारी अजय गाढे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी जावेद शेख याच्याविरुद्ध पोलीस स्टेशन गेवराई येथे अन्न सुरक्षा व मानके कायदा २००६ आणि भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली आहे.

ही धडक कारवाई पोलीस अधीक्षक नवनीत काँवत, अपर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर, उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल कटके आणि पोलीस निरीक्षक किशोर पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. या पथकात पोलीस उपनिरीक्षक राम खोत, संजय उदगिरकर, कल्याण राठोड, गणेश घोलप, अशोक हंबर्डे, गोरख डोके, जितेंद्र ओव्हाळ, कोंता शेळके आणि अन्न सुरक्षा अधिकारी अजय गाढे यांचा समावेश होता. या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक संजय उदगिरकर हे करत आहेत.


Categories

Recent Posts