Breaking
Updated: June 26, 2025
WhatsApp Group
Join Nowआरक्षण लढ्यासंदर्भात चर्चा
बीड: मराठा समाजाला आरक्षण मिळावे, यासाठी मराठायोध्दा मनोज जरांगे पाटील यांनी दि.१ ऑगस्टपर्यंत मागण्या मान्य करा अन्यथा दि.२९ ऑगस्टला मुंबईत आंदोलन करण्याची भूमिका घेतली असून या पार्श्वभुमीवर खा.बजरंग सोनवणे यांनी दि.२५ जून रोजी सांयकाळी अंतरवाली सराटी येथे जावून मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली. यावेळी मराठा आरक्षण आंदोलनावर दोघात सविस्तर चर्चाही झाली.
या प्रसंगी माजी मंत्री राजेश टोपे व माजलगाव विधानसभा मतदारसंघाचे नेते मोहन जगताप हे उपस्थित होते. दरम्यान, मनोज जरांगे पाटील यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, मराठा आणि कुणबी एकच असल्याचा अध्यादेश तात्काळ लागू करावा, हैद्राबाद, सातारा व बॉम्बे गॅझेटियर लागू करून त्यावर अंमलबजावणी करावी, ‘सगे-सोयरे’अधिसूचनेची तात्काळ अंमलबजावणी करावी, मराठा आरक्षणातील आंदोलकांवरील दाखल गुन्हे मागे घ्यावेत, मराठा आंदोलनातील बलिदान दिलेल्या कुटुंबांना नोकरी व आर्थिक मदत द्यावी, न्या.शिंदे समितीला मुदतवाढ द्यावी, संतोष अण्णा देशमुख हत्या आणि कोपर्डी प्रकरणातील आरोपींना फाशी देण्यात यावी. जर हे निर्णय १ ऑगस्ट २०२५ पर्यंत घेण्यात आले नाहीत, तर २९ ऑगस्ट २०२५ रोजी मुंबईत मोठे आंदोलन करण्याचा स्पष्ट इशारा या पत्रात देण्यात आला आहे. दरम्यान, खा.बजरंग सोनवणे यांनी मराठा समाजाच्या सर्व न्याय्य मागण्यांचे निवेदन योग्य त्या पातळीवर पोहोचवण्याचा प्रयत्न आपण करू, असेही यावेळी म्हटले आहे. मराठा आरक्षण लढ्यात आपण सोबत असून मराठा समाजाला आरक्षण मिळावे, यासाठी लढत असलेले मनोज जरांगे पाटील यांच्या पाठीशी संपुर्ण मराठा समाज ताकतीने उभा असल्याचा विश्वासही यावेळी त्यांनी दिला.