Breaking
Updated: ऑगस्ट 8, 2025
हरित बीड अभियानास अंबाजोगाईत उत्साहात सुरुवात
‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा
Join Channelसामाजिक वनीकरण विभागाच्या उपक्रमाला जनतेचा मोठा प्रतिसाद
अंबाजोगाई : “हरित महाराष्ट्र, समृद्ध महाराष्ट्र” या संकल्पनेतून साकारत असलेल्या ‘हरित बीड’ अभियानाला अंबाजोगाईत मोठ्या उत्साहात आणि जनसहभागातून सुरुवात झाली. सामाजिक वनीकरण विभागाच्या पुढाकाराने आयोजित या उपक्रमाचे उद्घाटन ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते नंदकिशोर (काकाजी) मुंदडा यांच्या हस्ते संपन्न झाले.
या कार्यक्रमास अंबाजोगाईतील प्रसिद्ध पक्षीमित्र शंकर कराड यांची विशेष उपस्थिती लाभली. बीड जिल्हा प्रशासनाने ७ ऑगस्ट २०२५ रोजी एकाच दिवशी तब्बल ३० लाख वृक्ष लागवडीचे मोठे उद्दिष्ट ठेवले असून, त्यात अंबाजोगाई तालुक्याचा वाटा ८६ हजार रोपांचा आहे. यामध्ये सामाजिक वनीकरण विभागामार्फत ६६ हजार वृक्षांची लागवड करण्यात येणार असून, स्थानिक नागरिकांच्या श्रमदानातून उर्वरित २० हजार रोपे लावण्यात येणार आहेत.
ही मोठी मोहीम यशस्वी व्हावी यासाठी विभागीय अधिकारी एस. एल. लखमावाड (सहाय्यक वनसंरक्षक) व यु. एम. बिराजदार यांच्या मार्गदर्शनाखाली अंबाजोगाईचे वनपरिक्षेत्र अधिकारी एस. जी. वरवडे यांनी काटेकोर नियोजन आखले आहे. या नियोजनाच्या अंमलबजावणीसाठी वनपाल श्रीमती पी. ए. खरात, एस. व्ही. पाखरे आणि वनरक्षक बी. आर. दहिफळे यांच्यासह इतर अधिकारी व कर्मचारी कार्यरत आहेत.
संपूर्ण तालुक्यात ठिकठिकाणी वृक्षलागवडीसाठी खड्डे खोदण्यापासून ते रोपांचे संरक्षण करण्यापर्यंत प्रत्येक टप्प्यावर प्रशासनाच्या नियोजनाचा ठसा दिसून येत आहे. सामाजिक वनीकरण विभागाच्या या उपक्रमात स्थानिक ग्रामस्थ, स्वयंसेवी संस्था, पर्यावरणप्रेमी आणि शाळा-महाविद्यालयांतील विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी होत आहेत.
हरित बीड अभियानामुळे जिल्ह्यात पर्यावरण संवर्धनास चालना मिळणार असून, भविष्यासाठी सजीव आणि समृद्ध हिरवळ तयार होणार आहे. प्रशासनाच्या या उपक्रमात अंबाजोगाईकरांनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.