Breaking

अंबाजोगाईत पालखी मार्गावर उघड्यावर खुलेआम मांस विक्री; भाविकांत संताप

Updated: June 28, 2025

By Vivek Sindhu

WhatsApp Image 2025 06 28 at 2.43.08 PM

WhatsApp Group

Join Now

मुख्य रस्त्यावरील दुकाने हटविण्याची मागणी

अंबाजोगाई (प्रतिनिधी) : सध्या आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरकडे जाणाऱ्या विविध संत पालख्या मार्गक्रमण करत असून, अंबाजोगाई शहरातील मुख्य पालखी मार्गही याच यात्रेचा भाग आहे. मात्र या मार्गावर पंचायत समिती कार्यालयासमोर व यशवंतराव चव्हाण चौक परिसरात उघड्यावर मांस विक्री करणारी अनेक अतिक्रमित दुकाने थाटण्यात आली आहेत. वारकरी संप्रदाय व भाविकांनी या गोष्टीबाबत तीव्र नाराजी व्यक्त करत तात्काळ ही दुकाने हटविण्यात यावीत अशी मागणी केली आहे.

बसस्थानकाच्या पुढे पं.स. कार्यालयाच्या गेटपर्यंत चिकन-मटण विक्री करणाऱ्या दुकानांचे अतिक्रमण सुरू आहे. आषाढ महिन्यात या मार्गावरून दररोज वारकऱ्यांच्या दिंड्या आणि पालख्या जात असतात. मात्र, त्या मार्गावर उघड्यावर चिकन, मटण विक्री होत असल्यामुळे भाविकांना व वारकऱ्यांना चमडी सोललेल्या कोंबड्या आणि बकऱ्यांच्या मुंडके कापून लटकविलेल्या धडांचे दर्शन होत असल्याने संकोचजनक स्थितीला सामोरे जावे लागत आहे. अनेक भाविकांनी या अनुभवाबाबत नाराजी व्यक्त केली असून, शहरातील धार्मिक वातावरणाला बाधा पोहचत असल्याचे सांगितले.

या संदर्भात भाविकांनी आणि सामाजिक संघटनांनी यापूर्वीही नगर परिषद व पोलिस प्रशासनाकडे तक्रारी केल्या आहेत. परंतु, अद्याप कोणतीही ठोस कारवाई न झाल्याने नागरिकांमध्ये प्रशासनाच्या भूमिकेबाबत नाराजी आहे. अंबाजोगाई हे योगेश्वरी देवीच्या मंदिरासाठी प्रसिद्ध असलेले धार्मिक स्थळ आहे. परंतु, बसस्थानक ते मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्यावर चिकन, मटणाचे अवशेष, लटकवलेले कोंबड्यांचे धड, मुंडकी अशा दृश्यांनी धार्मिक श्रद्धेचा अपमान होत आहे. विशेषतः बाहेरून येणाऱ्या भाविकांमध्ये याबाबत नाराजी असून, त्याचा वाईट ठसा शहराच्या प्रतिमेवर उमटत आहे.

उघड्यावर मांस विक्रीमुळे शहराच्या सौंदर्याला बाधा पोहोचतेच, परंतु आरोग्यदृष्ट्याही ते अतिशय घातक आहे. तज्ज्ञांच्या मते, अशा मांस विक्रीमुळे टायफॉईड, कॉलरा, कावीळ, गॅस्ट्रो यांसारख्या रोगांचा धोका वाढतो. तसेच उरलेले अवयव रस्त्यावर टाकल्यामुळे भटक्या कुत्र्यांचे टोळके या भागात फिरत असतात. कुत्रे वाहनामोर येऊन अनेकदा अपघात देखील झाले आहेत. कुत्र्यांमुळे रात्रीच्या वेळी तर या भागातून जीव मुठीत घेऊन जावे लागते. या पार्श्वभूमीवर नागरिकांची मागणी केली आहे की, शहरातील मांस विक्री संपूर्ण बंद न करता ती नियंत्रित पद्धतीने आणि नियोजित ठिकाणीच व्हावी. भाजी मंडईच्या धर्तीवर बंदिस्त ‘मटन मार्केट’ची उभारणी करावी आणि मुख्य रस्त्यावरील सर्व मांस विक्रीची दुकाने त्वरित हलवावीत. यामुळे शहराचे धार्मिक, सामाजिक व आरोग्यदृष्ट्या सौंदर्य टिकून राहील, असे मत अनेकांनी व्यक्त केले आहे.

प्रशासनाने या गंभीर समस्येकडे तातडीने लक्ष देऊन आवश्यक ती कारवाई करावी, अशी मागणी शहरवासीय आणि भाविकांच्या वतीने जोर धरू लागली आहे.