Breaking

सैन्यदलात नोकरीचे आमिष दाखवून १० लाखांची फसवणूक; वर्षभरापासून फरार असलेला आरोपी वडवणी पोलिसांच्या जाळ्यात

Updated: एप्रिल 18, 2026

By Vivek Sindhu

वर्षभरापासून फरार असलेला आरोपी वडवणी पोलिसांच्या जाळ्यात

‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा

Join Channel

वडवणी: सैन्यदलात नोकरी लावून देण्याच्या नावाखाली १० लाख रुपयांची फसवणूक करून गेल्या एक वर्षापासून पोलिसांना गुंगारा देणाऱ्या एका आरोपीला जेरबंद करण्यात वडवणी पोलिसांना यश आले आहे. या प्रकरणातील एका आरोपीला यापूर्वीच अटक करण्यात आली होती, तर दुसरा मुख्य संशयित आता पोलिसांच्या ताब्यात आहे.

या गुन्ह्याची सविस्तर माहिती अशी की, १३ फेब्रुवारी २०२५ रोजी सिताराम प्रभू बडे (रा. चिंचवन) यांनी पोलीस ठाणे वडवणी येथे तक्रार दाखल केली होती. आरोपी दिवाकर नादी आणि पवन भिवा भोसले यांनी फिर्यादीचा लहान भाऊ अंगद बडे याला मिलिटरीमध्ये नोकरी लावून देतो असे आमिष दाखवले होते. त्यासाठी त्यांनी १० लाख रुपयांची मागणी केली होती. फिर्यादीने ही रक्कम रोख आणि ऑनलाईन पद्धतीने दिल्यानंतर आरोपींनी त्यांना खडकी कॅन्टोन्मेंट बोर्ड, पुणे येथील खोट्या सह्या आणि शिक्क्यांचे बनावट नियुक्तीपत्र दिले. मात्र, संबंधित कार्यालयात चौकशी केली असता असे कोणतेही नियुक्तीपत्र दिले नसल्याचे समोर आले आणि आपली फसवणूक झाल्याचे फिर्यादीच्या लक्षात आले.

सदर प्रकरणात दिवाकर नादी याला आधीच अटक करण्यात आली होती, मात्र पवन भिवा भोसले (रा. देवांग्रा, ता. भूम, जि. धाराशिव) हा एक वर्षापासून पोलिसांना गुंगारा देत होता. १४ एप्रिल २०२६ रोजी तो आपल्या गावी येणार असल्याची गोपनीय माहिती मिळाल्याने वडवणी पोलिसांनी परांडा पोलिसांच्या मदतीने त्यास अटक केली. न्यायालयाने आरोपीला तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली असून तो सध्या पोलीस कोठडीत आहे.

ही कारवाई सहाय्यक पोलीस निरीक्षक वर्षा व्हगाडे यांच्या मार्गदर्शनाखाली आदिनाथ तांदळे, अशोक केदार आणि विश्वजीत मुंड यांनी केली आहे. सुशिक्षित बेरोजगार युवकांनी सरकारी नोकरीच्या अमिषाला बळी पडू नये आणि कुणी पैशांची मागणी केल्यास तात्काळ पोलिसात तक्रार करावी, असे आवाहन वडवणी पोलिसांनी केले आहे.


Categories

Recent Posts