Breaking

अंबाजोगाईत पोलिसांच्या नाकावर टिच्चून फरार आरोपीचे रिल्स!

Updated: मार्च 12, 2026

By Vivek Sindhu

हॉटेल व्यावसायिकावरील हल्ल्यातील मुख्य सूत्रधार अद्याप मोकाट

‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा

Join Channel

हॉटेल व्यावसायिकावरील हल्ल्यातील मुख्य सूत्रधार अद्याप मोकाट

अंबाजोगाई: येथील प्रसिद्ध हॉटेल व्यावसायिक अविनाश मेहता यांच्यावर प्राणघातक हल्ला करून दहशत माजवणारा मुख्य आरोपी राहुल भारत इदगले तीन दिवस उलटूनही पोलिसांना सापडलेला नाही. मात्र, पोलीस यंत्रणेला चकवा देणारा हा आरोपी सोशल मीडियावर उघडपणे रिल्स पोस्ट करून फिर्यादीला धमकावत असल्याने शहरात खळबळ उडाली आहे. “शुरुवात तुमने की है, तो माहोल हम भी बना सकते है” अशा आशयाचे चिथावणीखोर संवाद असलेले रिल्स आरोपीने बुधवारी दुपारी प्रसारित केले असून, यामुळे अंबाजोगाई शहर पोलिसांच्या कार्यक्षमतेवर आणि कायद्याच्या धाकावर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

या घटनेची सविस्तर पार्श्वभूमी अशी की, रविवारी सायंकाळी सात वाजेच्या सुमारास मोंढा भागातील मुख्य रस्त्यावर गाडीला बाजू देण्याच्या क्षुल्लक कारणावरून राहुल इदगले आणि त्याच्या साथीदारांनी अविनाश मेहता यांच्यावर लोखंडी रॉड व काठीने भीषण हल्ला केला होता. या हल्ल्यात मेहता गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. केवळ मारहाण करून न थांबता या टोळक्याने मेहता यांच्या ‘मेवाड बिस्ट्रो’ या हॉटेलवर जाऊन तोडफोड केली आणि सुमारे वीस हजार रुपयांचे नुकसान केले. यावेळी आरोपींनी पोलिसांत तक्रार केल्यास जिवे मारण्याची धमकीही दिली होती. या प्रकरणी अंबाजोगाई शहर पोलीस ठाण्यात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र घुगे या प्रकरणाचा तपास करत आहेत.

घटनेला तीन दिवस उलटूनही मुख्य आरोपी पोलिसांच्या हाताला लागलेला नाही. असे असताना आरोपीने बुधवारी दुपारी स्वतःच्या फोटोवर आक्रमक संवाद असलेले रिल इन्स्टाग्रामवर पोस्ट केले आहे. जो आरोपी पोलिसांना शोध मोहिमेत सापडत नाही, तो सोशल मीडियावर मात्र सक्रिय असल्याचे पाहून नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे. उघडपणे रिल्स बनवून तो फिर्यादीला अप्रत्यक्षपणे धमकावत असल्याने पोलिसांचा धाक उरला आहे की नाही, असा सवाल सर्वसामान्य विचारत आहेत. भरवस्तीत घडलेल्या या प्रकारामुळे स्थानिक व्यापाऱ्यांमध्ये सुरक्षेबाबत भीतीचे वातावरण असून, फरार आरोपीला तात्काळ अटक करण्याची मागणी जोर धरत आहे.


Categories

Recent Posts