Breaking
Updated: मे 20, 2026
ई-फार्मसीच्या बेकायदेशीर कारभाराविरोधात अंबाजोगाईत औषध विक्रेत्यांचा कडकडीत बंद; उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन
‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा
Join Channelअंबाजोगाई: देशात आणि राज्यात इंटरनेटच्या माध्यमातून सुरू असलेल्या बेकायदेशीर ऑनलाइन औषध विक्री आणि ई-पोर्टलच्या विरोधात अखिल भारतीय औषधी विक्रेता संघटनेने (AIOCD) पुकारलेल्या देशव्यापी आंदोलनाला अंबाजोगाई तालुका आणि बीड जिल्ह्यात तीव्र प्रतिसाद मिळाला आहे. या आंदोलनाचा भाग म्हणून आज, बुधवार दिनांक २० मे रोजी अंबाजोगाई येथील औषध विक्रेत्यांनी आपापली प्रतिष्ठाने पूर्णपणे बंद ठेवून केंद्र व राज्य शासनाचा निषेध नोंदवला. अंबाजोगाई तालुका केमिस्ट अँड ड्रगिस्ट संघटनेच्या वतीने आज उपविभागीय अधिकारी (एसडीएम) यांना मागण्यांचे सविस्तर निवेदन सादर करण्यात आले. या देशव्यापी बंदमुळे परिसरातील औषध बाजारपेठ पूर्णपणे ठप्प झाली असून, शासनाचे लक्ष वेधण्यासाठी औषध विक्रेते रस्त्यावर उतरले आहेत.
ऑनलाइन औषध विक्रीमुळे औषध निर्मिती आणि वितरण क्षेत्रातील नियमांचे सर्रास उल्लंघन होत असून, यामुळे तरुण पिढीच्या आरोग्याशी खेळ केला जात असल्याचा आरोप औषध विक्रेत्यांनी केला आहे. केंद्र सरकारने या संदर्भात जारी केलेले विविध नियम आणि अधिसूचना, तसेच कोविड काळातील तरतुदींचा आधार घेत ई-फार्मसी कंपन्यांकडून बेकायदेशीर व्यवसाय सुरू असल्याकडे संघटनेने प्रशासनाचे लक्ष वेधले. या गंभीर समस्येबाबत संघटनेच्या वतीने यापूर्वी अनेकदा संबंधित केंद्रीय मंत्री, राज्यमंत्री आणि उच्चपदस्थ प्रशासकीय अधिकाऱ्यांना प्रत्यक्ष भेटून निवेदने देण्यात आली होती, तसेच या धोक्याची जाणीव करून देण्यात आली होती. मात्र, एवढे प्रयत्न करूनही शासन आणि प्रशासनाकडून नेहमीच नकारात्मक किंवा उदासीन भूमिका घेतली गेल्यामुळे अखेर संपूर्ण देशभरात हा लाक्षणिक बंद पुकारण्याची वेळ औषध विक्रेत्यांवर आली आहे.
अंबाजोगाई तालुका आणि बीड जिल्ह्यातील सर्व औषध विक्रेत्यांनी या बंदमध्ये सक्रिय आणि उत्स्फूर्त सहभाग घेतला आहे. या आंदोलनाची तीव्रता लक्षात आणून देण्यासाठी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही या संदर्भातील सविस्तर निवेदनपत्र माहितीसाठी आणि योग्य त्या कायदेशीर कारवाईसाठी पाठवण्यात आले असून, त्याची प्रत स्थानिक प्रशासनाकडे सुपूर्द करण्यात आली आहे. आपल्या रास्त मागण्या आणि औषध विक्रेत्यांच्या भावना केंद्र व राज्य सरकारपर्यंत तातडीने पोहोचवाव्यात, अशी नम्र विनंती संघटनेच्या वतीने स्थानिक महसूल प्रशासनाला करण्यात आली आहे.
दरम्यान, या देशव्यापी बंदच्या काळात सर्वसामान्य नागरिक आणि रुग्णांची कोणत्याही प्रकारची गैरसोय होऊ नये, यासाठी संघटनेने विशेष काळजी घेतली आहे. बंदच्या काळात जर एखाद्या रुग्णाला अत्यंत तातडीच्या व अत्यावश्यक औषध सेवेची गरज भासली, तर जिल्हा व तालुका संघटनेचे अध्यक्ष, सचिव आणि इतर सर्व पदाधिकारी योग्य ते समन्वय साधून रुग्णांना मदत करण्यासाठी तत्पर राहतील, असे आश्वासन देण्यात आले आहे. या आंदोलनाचे नेतृत्व अंबाजोगाई तालुका केमिस्ट अँड ड्रगिस्ट संघटनेचे अध्यक्ष मुस्तफा यासीन शेख आणि सचिव पवन पुरुषोत्तम चोकडा यांच्यासह तालुक्यातील प्रमुख पदाधिकाऱ्यांनी केले असून, प्रशासनाकडून सकारात्मक सहकार्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.