Breaking

जेसीबी चालकावर डिझेल टाकून जिवंत जाळण्याचा प्रयत्न; ३ जणांवर प्राणघातक हल्ल्याचा गुन्हा दाखल

Updated: मे 19, 2026

By Vivek Sindhu

जेसीबी चालकावर डिझेल टाकून जिवंत जाळण्याचा प्रयत्न; ३ जणांवर प्राणघातक हल्ल्याचा गुन्हा दाखल

‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा

Join Channel

बीड: रस्ता दुरुस्तीच्या कामावरून झालेल्या वादातून एका जेसीबी चालकाच्या अंगावर डिझेल ओतून त्याला जिवंत जाळण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना खामगाव शिवारात घडली आहे. या हिंसक हल्ल्यात मध्यस्थी करणाऱ्या एका तरुणावर चाकूने वार करण्यात आले असून, जेसीबी मशीन व मोटारसायकलची तोडफोड करण्यात आली आहे. याप्रकरणी बीड ग्रामीण पोलीस ठाण्यात प्रल्हाद भावले, केशव भावले आणि सोनदेव उर्फ बंडू भावले यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शाहरुख रहिमान पठाण (वय २१, व्यवसाय ड्रायव्हर, रा. खामगाव) हा शाहेद पटेल यांच्या जेसीबीवर ऑपरेटर म्हणून काम करतो. १७ मे रोजी दुपारी चारच्या सुमारास खामगाव येथील फिरंगे वस्ती रस्त्यावर तो जेसीबीने खडी पांगवण्याचे काम करत होता. दरम्यान, गावातला प्रल्हाद भावले तिथे ट्रॅक्टर घेऊन आला आणि मशीनवर दगड मारून शाहरुखला शिवीगाळ करत लोखंडी टांबीने मारहाण केली. एवढ्यावरच न थांबता त्याने ट्रॅक्टरमधील डिझेल शाहरुखच्या अंगावर ओतले आणि काडी पेटवून त्याच्या पाठीवर टाकली, ज्यामुळे शाहरुखच्या शर्टने पेट घेतला.

हा प्रकार पाहून शेख फैजान करीम धावून आला आणि त्याने आग विझवण्याचा प्रयत्न केला. मात्र, प्रल्हादने त्याच्यावरही धारदार चाकूने वार केले. त्यानंतर प्रल्हादचे वडील केशव भावले व भाऊ बंडू भावले तिथे आले आणि त्यांनीही लाथाबुक्क्यांनी व टांबीने बेदम मारहाण केली. आरोपींनी जेसीबीच्या काचा आणि अन्य एकाची मोटारसायकल फोडून नुकसान केले. जखमींवर लोट्स हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असून, पोलिसांनी भारतीय न्याय संहितेच्या कलम १०९, ११५(२), ११८(१), ३२४(४), ३२४(५), ३५२, ३५१(२) आणि ३(५) अन्वये गुन्हा नोंदवला आहे. पोलीस निरीक्षक बाळराजे दरडे पुढील तपास करत आहेत.


Categories

Recent Posts