Breaking

जिल्ह्यात कृषी निविष्ठांची कृत्रिम टंचाई निर्माण करणाऱ्यांवर कारवाई करावी

Updated: मे 20, 2026

By Vivek Sindhu

जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन

‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा

Join Channel

जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन 

 बीड – जिल्ह्यात खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना बियाणे, खते व इतर कृषी निविष्ठा मुबलक आणि गुणवत्तापूर्ण उपलब्ध करून देण्यासाठी प्रशासनाने चोख नियोजन करावे. तसेच जिल्ह्यात कृषी निविष्ठांची कृत्रिम टंचाई निर्माण करणाऱ्यावर कारवाई करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी दिले.

 जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात आयोजित कृषी विभागाच्या जिल्हास्तरीय खरीप हंगामपूर्व आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी बैठकीस जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितीन रहमान, प्र.जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सुभाष साळवे, कृषी उपसंचालक दादाराव जाधव यांच्यासह संबंधित विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन म्हणाले की, कृषी निविष्ठांची कृत्रिम टंचाई निर्माण करणाऱ्या तसेच विशिष्ट कंपनीचे उत्पादन घेण्याची शेतकऱ्यांना सक्ती करणाऱ्या दुकानदारांवर कठोर कारवाई करावी. कृषी विभागाच्या भरारी पथकांनी वेळोवेळी कृषी केंद्रांना भेट देऊन तपासणी करावी, तसेच टोल फ्री क्रमांकावर प्राप्त तक्रारींवर तात्काळ कार्यवाही करावी, असेही त्यांनी स्पष्ट केले. बोगस बियाणांची विक्री रोखण्यासाठी विशेष दक्षता घेण्याच्या सूचनाही त्यांनी या बैठकीत दिल्या. कृषी केंद्र दुकानदारांनी बियाणे खरेदीसाठी शेतकऱ्यांवर कोणतीही अट लादू नये, अन्यथा संबंधितांविरोधात कारवाई केली जाईल, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला. यावेळी जिल्हाधिकारी जॉन्सन यांनी बीड जिल्ह्यात गायरान जमिनीसह इतर ठिकाणी चारा लागवडीचे क्षेत्र वाढविण्यावर भर देण्यास सांगितले. तसेच पोकरा योजनेअंतर्गत रेशीम उत्पादनासाठी क्षेत्रवाढ करण्याचे निर्देशही त्यांनी दिले. पीक कर्ज वितरणाबाबतही त्यांनी बँक अधिकाऱ्यांना सूचना देत जिल्ह्यात 100 टक्के पीक कर्ज उद्दिष्ट पूर्ण करण्यावर भर दिला. कर्ज वितरणात हलगर्जीपणा करणाऱ्या अधिकाऱ्यांवर नियमानुसार कार्यवाही प्रस्तावित केली जाईल, असे ही त्यांनी सांगितले.

सुरुवातीस प्रास्ताविकात आत्माचे प्रकल्प संचालक तथा प्र. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सुभाष साळवे यांनी खरीप हंगाम जून 2026 पासून सुरू होत असल्याची माहिती दिली. यात बीड जिल्ह्यात 10.68  लाख हेक्टर भौगोलिक क्षेत्र असून सरासरी 8.85 लाख हेक्टर क्षेत्रावर खरीप लागवड केली जाते. असे सांगून त्यांनी बि-बियाणांसह खत साठ्याची माहिती, पिक विमा, पिक कर्ज, मृदा तपासणी, शेतकरी अनुदान वाटप याची संगणकीय सादरीकरणाद्वारे माहिती दिली. तसेच बदलत्या हवामानाशी सुसंगत शेतीसाठी पोकरा योजनेतून शेतकऱ्यांना सक्षम करण्याचे प्रयत्न सुरू असून उत्पादनवाढीसाठी विविध नाविन्यपूर्ण प्रयोग राबविण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.


Categories

Recent Posts