Home »
Kaij » परिवहनमंत्र्यांनी घेतली स्व. संतोष देशमुख यांच्या कुटुंबांची भेट
परिवहनमंत्र्यांनी घेतली स्व. संतोष देशमुख यांच्या कुटुंबांची भेट
केज – राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी हत्या झालेले मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांच्याशी संवाद साधला.
पवन ऊर्जा कंपनीकडे खंडणी मागण्यास विरोध केला म्हणून मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची ९ डिसेंबर २०२४ रोजी अपहरण करून निर्घृणपणे हत्या करण्यात आली होती. या प्रकरणी त्यांच्या सर्व मारेकऱ्यांविरुद्ध दाखल असलेल्या खून व मकोका कायद्या अंतर्गत गुन्ह्याचे प्रकरण विशेष न्यायालयात सुरू आहे.
सरकारी पक्षाच्या वृत्तीने प्रसिद्ध विधीज्ञ ॲड. उज्ज्वल निकम हे खटला लढवित आहेत. तर फरार आरोपी कृष्णा आंधळे वगळता सर्व आरोपी कारागृहात आहेत.
दरम्यान, १२ जून रोजी राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी देशमुख कुटुंबीयांची मस्साजोग येथे भेट घेतली. यावेळी संतोष देशमुख यांचे भाऊ धनंजय देशमुख, मुलगी वैभवी देशमुख आणि त्यांचा मुलगा विराज देशमुख यांच्यासह गावकरी उपस्थित होते. यावेळी गावकऱ्यांनी मंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडे स्व. संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना लवकरात लवकर फाशीची शिक्षा व्हायला हवी. अशी मागणी केली. तर सरनाईक यांनी देशमुख कुटुंबाला धीर देत सरकार त्यांच्यासोबत असल्याची ग्वाही दिली.
वैभवीला लॅपटॉप भेट दिला
वैभवी देशमुख हिने वडिलांच्या हत्येनंतर १२ वीची परीक्षा दिली. तिने ८५.३३ टक्के गुण मिळविले होते. तिने ज्या धीराने परीक्षेत यश मिळविले, त्याबद्दल परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी कौतुक करीत तिला एक लॅपटॉप भेट दिला.
घर बांधकामाची केली पाहणी
स्व. सरपंच संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांसाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मदतीतून बांधण्यात येत असलेल्या दोन मजली घराची प्रताप सरनाईक यांनी भेट देऊन पाहणी केली.
४० जणांचे रक्तदान
स्व. संतोष देशमुख यांच्या जयंतीनिमित्त मस्साजोग येथे घेण्यात आलेल्या रक्तदान शिबिरात वैभवी देशमुख, धनंजय देशमुख यांच्यासह चाळीसहून अधिक जणांनी रक्तदान केले.