वीज वितरण कार्यालय आणि पोलीस ठाण्यात आपल्या विरोधात तक्रार केल्याचा राग मनात धरून एका कुटुंबावर तब्बल अकरा जणांच्या जमावाने लोखंडी सळई आणि काठ्यांनी जीवघेणा हल्ला केल्याची अत्यंत गंभीर घटना गेवराई तालुक्यातील वाघपिंपळगाव कॅम्प येथे घडली आहे. श्रीनिवास बाजीराव देवकते आणि त्यांच्या पत्नीला घरासमोर शिवीगाळ करत या जमावाने अत्यंत क्रूरपणे मारहाण केली.

या हल्ल्यात पती-पत्नी दोघेही गंभीर जखमी झाले असून त्यांना गावातून जिवंत न सोडण्याची धमकीही देण्यात आली आहे. याप्रकरणी गेवराई पोलीस ठाण्यात दीपक देवकते, ओमकार देवकते यांच्यासह एकूण अकरा जणांवर दंगल आणि मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पूर्ववैमनस्यातून झालेल्या या हिंसक हल्ल्याने गावात सध्या प्रचंड तणावाचे वातावरण निर्माण झाले असून पोलीस या प्रकरणाचा गांभीर्याने तपास करत आहेत.