बीड - बालकांचे आरोग्य, पोषण आणि शारीरिक तसेच बौद्धिक विकास सुधारण्याच्या उद्देशाने बीड जिल्ह्यात २७ ऑक्टोबर २०२६ रोजी राष्ट्रीय जंतनाशक मोहीम राबविण्यात येणार आहे. या मोहिमेअंतर्गत जिल्ह्यातील १ ते १९ वर्षे वयोगटातील एकूण ६,४३,०२६ बालकांना जंतनाशक औषध दिले जाणार आहे. सर्व पालकांनी आपल्या पाल्यांना या मोहिमेचा लाभ मिळवून द्यावा, असे आवाहन जिल्हा परिषदेचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. उल्हास प. गंडाळ व आरोग्य विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.
जिल्ह्यात एकूण ७०७० ठिकाणी औषध वाटप केंद्रे निश्चित करण्यात आली आहेत. यामध्ये ६५ आरोग्य संस्था, ३१८८ अंगणवाड्या, २४३८ शासकीय शाळा व विद्यालये आणि १३७९ खाजगी व इतर शाळांचा समावेश आहे. या सर्व केंद्रांवरून राष्ट्रीय जंतनाशक मोहिमेद्वारे पात्र बालकांना अल्बेंडाझोल हे जंतनाशक औषध देण्यात येणार आहे. एखाद्या कारणास्तव जी बालके २७ ऑक्टोबर रोजी औषध घेण्यापासून वंचित राहतील, त्यांच्यासाठी ३ नोव्हेंबर २०२६ रोजी मॉप-अप राऊंडचे आयोजन करण्यात आले असून या दिवशी त्यांना औषध दिले जाईल. या मोहिमेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी आरोग्य विभाग, शिक्षण विभाग, महिला व बालविकास विभाग, आशा स्वयंसेविका, अंगणवाडी सेविका आणि शिक्षक यांच्यात समन्वय साधण्यात येत आहे.
अस्वच्छता, दूषित मातीचा संपर्क आणि वैयक्तिक स्वच्छतेच्या अभावामुळे बालकांना आतड्यांतील जंतांचा संसर्ग होतो. या संसर्गामुळे बालकांमध्ये रक्तक्षय, कुपोषण, अशक्तपणा, भूक न लागणे आणि पोटदुखी यांसारख्या समस्या उद्भवतात. तसेच यामुळे मुलांच्या शारीरिक वाढीवर, मानसिक विकासावर आणि शाळेतील उपस्थितीवरही प्रतिकूल परिणाम होऊ शकतो. काही बालकांमध्ये लक्षणे दिसत नसली तरीही संसर्गाचा धोका असतो, त्यामुळे पात्र बालकांना जंतनाशक औषध देणे अत्यंत महत्त्वाचे आहे. या उपचारामुळे बालकांची पोषणस्थिती सुधारण्यास आणि त्यांच्या निरोगी विकासास मोठी मदत होते.
औषधोपचारासोबतच जंतसंसर्गापासून कायमस्वरूपी संरक्षण मिळवण्यासाठी स्वच्छतेच्या सवयी पाळणे आवश्यक असल्याचे आरोग्य विभागाने स्पष्ट केले आहे. जेवणापूर्वी आणि शौचालयाचा वापर केल्यानंतर साबणाने हात धुणे, पिण्यासाठी स्वच्छ पाणी वापरणे, फळे व भाज्या स्वच्छ धुवून खाणे, नखे स्वच्छ व कापलेली ठेवणे, पादत्राणांचा वापर करणे आणि शौचालयाचा नियमित वापर करणे गरजेचे आहे. औषध देताना बालकाच्या वयानुसार अधिकृत मार्गदर्शक सूचनांनुसार औषधाची मात्रा निश्चित केली जाईल. बालकांचे आरोग्य सुदृढ ठेवण्यासाठी आणि समाजाला जंतमुक्त करण्यासाठी सर्व पालकांनी २७ ऑक्टोबर रोजी आपल्या पाल्यांना शाळेत किंवा अंगणवाडी केंद्रात उपस्थित ठेवून या मोहिमेत सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.













प्रतिक्रिया (०)
अद्याप प्रतिक्रिया नाहीत. पहिली प्रतिक्रिया तुम्हीच द्या!