दारूच्या व्यसनाने एका कुटुंबाची शांतता कशी हिरावून घेतली आहे, याचा अत्यंत खळबळजनक प्रकार गेवराई तालुक्यातील पांचाळेश्वर गावात घडला आहे. दारू पिण्यासाठी पैसे न दिल्याच्या रागातून पतीने स्वतःच्याच पत्नीला चक्क टेस्टरने बेदम मारहाण करत जिवे मारण्याची धमकी दिली. मंगळवारी सकाळी ही भयंकर घटना घडली.

वैशाली समाधान पटाईत या ३२ वर्षीय महिलेने दिलेल्या फिर्यादीवरून चकलांबा पोलीस ठाण्यात पती समाधान रामभाऊ पटाईत याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घरात सतत पैशांवरून वाद घालणाऱ्या पतीने थेट क्रूरतेची सर्व हद्द पार करत पत्नीवर असा जीवघेणा हल्ला केल्याने ग्रामीण भागात संतापाची लाट उसळली आहे. महिलांच्या सुरक्षिततेचा आणि वाढत्या व्यसनाधीनतेचा भीषण प्रश्न या घटनेने पुन्हा एकदा चव्हाट्यावर आणला आहे. स्थानिक पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत.