Breaking
Updated: ऑगस्ट 18, 2025
मांजरा धरणाचे आणखी दोन दरवाजे उघडले
‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा
Join Channelसहा दरवाज्यातून ५२४१ क्युसेक्स विसर्ग सुरू
केज – धनेगाव (ता. केज) येथील मांजरा धरणात ९० टक्के पाणी साठा झाल्यानंतर पाण्याची आवक विचारात घेत पाणी पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी शनिवारी (दि. १६) दुपारी २ वाजता धरणाचे चार दरवाजे २५ सेंटीमीटरने उघडून मांजरा नदी पात्रात पाण्याचा विसर्ग सुरू होता. १७ तासात ६ दलघमी इतके पाणी सोडून देण्यात आले. मात्र सोमवारी सकाळी धरणात ९३.७३ टक्के पाणी साठा वाढल्याने दुपारी १२ वाजता आणखी दोन दरवाजे उघडून ५२४१.४२ क्युसेक्स विसर्ग वाढविण्यात आला आहे.
१५ ऑगस्ट रोजी अतिवृष्टीने नदी, नाल्यांना पूर आले. तर पाटोदा येथील सर्व तलाव भरल्याने मांजरा नदीचे पाणी वाढले. मांजरा नदीच्या पुराच्या पाण्याने अवघ्या दोन दिवसात मांजरा धरण हे ३६.७० टक्क्यावरून ९० टक्के भरले. तर धरणात येणाऱ्या पाण्याची आवक लक्षात घेऊन पाणी पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी शनिवारी दुपारी २ वाजता धरणाचे चार दरवाजे २५ सेंटीमीटरने उघडून ३४९४ क्यूसेक्सने मांजरा नदी पात्रात पाण्याचा विसर्ग केला जात होता. धरणात पाण्याची आवक सुरू राहिल्याने सोमवारी सकाळी धरणात ९३.७३ टक्के पाणी वाढल्याने पाणी पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी दुपारी १२ वाजता आणखी दोन दरवाजे २५ सेंटीमीटरने उघडून विसर्ग केला जात आहे. सध्या धरणाच्या द्वार क्र. १,२,३,४,५,६ या सहा दरवाज्यातून ५२४१.४२ क्युसेक्सने मांजरा नदी पात्रात विसर्ग सुरू आहे. मांजरा धरणाखाली मांजरा नदीच्या काठी वसलेल्या केज तालुक्यातील धनेगाव, नायगाव, सौंदाणा, इस्थळ, अंबाजोगाई तालुक्यातील आपेगाव, धानोरा, अंजनपूर, देवळा, अकोला, तट बोरगाव, कळंब तालुक्यातील आवाड शिरपुरा, सौंदणा अंबा, वाकडी, लासरा, रेणापूर तालुक्यातील तडोळा, पोहरेगाव, सांगली, आदलगाव, डिगोळ देशमुख, डिगोळ देशपांडे, वांगदरी तर लातूर तालुक्यातील कानडी बोरगाव, तांदुळजा, सारसा, गाधवडा, वांजरखेडा, बोडका, गांजूर, रुई रामेश्वर, ताडकी, काटक्षा, टाकळगाव या ३३ गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.