Breaking

गरिबांच्या घरांवर डल्ला मारणारे ‘पांढरपेशी दरोडेखोर’; केज नगरपंचायतीत ४ कोटींचा महाघोटाळा, ६ जणांवर गुन्हा!

Updated: एप्रिल 25, 2026

By Vivek Sindhu

केज नगरपंचायतीत ४ कोटींचा महाघोटाळा, ६ जणांवर गुन्हा!

‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा

Join Channel

केज: केज नगरपंचायतीत गरिबांच्या हक्काच्या घरकुलावर डल्ला मारण्याचा संतापजनक प्रकार समोर आला असून तब्बल ४ कोटी २४ लाख ७३ हजार २३ रुपयांचा अपहार केल्याप्रकरणी सहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नगरपंचायतीचे मुख्याधिकारी अजित गणपतराव ढोपे यांनी याप्रकरणी फिर्याद दिली असून यामध्ये तत्कालीन मुख्याधिकारी आणि लेखापालांसह चक्क व्हॉल्वमनचाही समावेश असल्याने जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे. आरोपींनी प्रधानमंत्री आवास योजनेचा निधी पात्र लाभार्थ्यांऐवजी इतर खात्यांवर बेकायदेशीरपणे वळवून शासनाची आणि सर्वसामान्यांची मोठी फसवणूक केली आहे.

गुन्हा दाखल झालेल्यांमध्ये तत्कालीन मुख्याधिकारी मिलींद सावंत (वय ६०, रा. मुंबई), तत्कालीन लेखापाल असद इसाकोद्दीन खतीब (वय ५८, रा. नवा मोंढा, केज), कंत्राटी लेखापाल लक्ष्मण मारोती जगताप (वय ६६, रा. बीड), आणि व्हॉल्वमन भास्कर एकनाथ ससाणे (वय ५९, रा. केज), भीमराव शामराव मस्के (वय ५४, रा. केज), बासेद वलीयोद्दीन काझी (वय ४८, रा. केज) यांचा समावेश आहे. २० मे २०२१ ते ३१ जानेवारी २०२२ या कालावधीत हा प्रचंड मोठा भ्रष्टाचार करण्यात आला असून गुन्ह्याचा पुरावा नष्ट करण्यासाठी महत्त्वाची शासकीय कागदपत्रे आणि लेखा संचिकाही गहाळ करण्यात आल्या आहेत. म्हाडा कार्यालय आणि जिल्हाधिकाऱ्यांनी नेमलेल्या विशेष चौकशी समितीच्या सखोल तपासणीनंतर हा घोटाळा उघडकीस आला आहे.

या प्रकरणातील सर्वात धक्कादायक बाब म्हणजे व्हॉल्वमन भास्कर ससाणे याच्या खात्यावर ५९ लाख, भीमराव मस्के याच्या खात्यावर १९ लाख आणि बासेद काझी याच्या खात्यावर ६ लाख ६० हजार रुपये वर्ग करण्यात आले होते. केज पोलीस ठाण्यात भारतीय दंड संहितेच्या कलम ४२०, ४०९, २०१, २०४ आणि ३४ अन्वये हा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक संदीप रामराव मंजरमे या गंभीर प्रकरणाचा पुढील तपास करत असून या भ्रष्टाचाराचे धागेदोरे आणखी कोणापर्यंत पोहोचतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.


Categories

Recent Posts