Breaking

कीड व रोगावर नियंत्रण आणण्यासाठी सोयाबीन पिकांमध्ये बीज प्रक्रिया महत्त्वाची : योगेश पाटील

Updated: June 16, 2025

By Vivek Sindhu

कीड व रोगावर नियंत्रण आणण्यासाठी सोयाबीन पिकांमध्ये बीज प्रक्रिया महत्त्वाची : योगेश पाटील

WhatsApp Group

Join Now

केज – सोयाबीन पिकास पिवळा मोझ्याक खोडकीडा, खोडमाशी, पांढरी माशी, मावा, फुलकिडे, विषाणूजन्य रोग करपा हे कीड व रोग मातीमधील बुरशीमधून व बियाणेद्वारे होऊ शकतात. त्यासाठी बीजप्रक्रिया करणे आवश्यक आहे. शिवाय इतर पिकांच्याही बीजप्रक्रियेला महत्व द्यावे, असे आवाहन आत्माचे बीटीएम योगेश पाटील यांनी केले.
कृषि विभाग व आत्माच्या वतीने जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी तथा प्रकल्प संचालक सुभाष साळवे यांच्या मार्गदर्शनाखाली व केजचे तालुका कृषि अधिकारी सागर पठाडे यांच्या नियोजनातून तालुक्यात बीजप्रक्रिया कार्यक्रम सुरू आहे. सोनीजवळा येथे आयोजित सोयाबीन बीजप्रक्रिया कार्यक्रमात योगेश पाटील हे बोलत होते. यावेळी सहाय्यक कृषि अधिकारी दत्ता नांदे यांची प्रमुख उपस्थिती होती.
पुढे बोलताना योगेश पाटील म्हणाले की, सोयाबीन अथवा इतर पिकांच्या पेरणी वेळेस बिजप्रक्रियेस फारसे महत्व दिले जात नाही. बीज प्रक्रिया ही जरी क्षुल्लक बाब असली तरी बीजप्रक्रिया केल्याने शेतकऱ्यांना मोठा फायदा होऊ शकतो. भविष्यात येणाऱ्या कीड व रोगांवर नियंत्रण आणण्यास बीज प्रक्रिया खूप महत्त्वाची आहे. सोयाबिन बियाणे यास बीज प्रक्रिया करूनच पेरणी करावी. यामुळे बुरशीवर मात करता येते. असे मत मांडले.
यावेळी सहाय्यक कृषि अधिकारी दत्ता नांदे यांनी कृषि विभागाच्या ३० कलमी कार्यक्रमाविषयी माहिती दिली. कार्यक्रमास संत सावता शेतकरी बचत गटातील सदस्य सुनिल ससाणे, आसाराम ससाणे, प्रल्हाद ससाणे, देविदास ससाणे, अमोल ससाणे, अरुण भाडंवलकर यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.

अशी करा बीजप्रक्रिया

रासायनिक बुरशीनाशकाची प्रक्रिया शिफारशीनुसार करावी. त्यासाठी साधारणत: ३ ग्रॅम थायरम अथवा कार्बेन्डेन्झीम ३ ते ४ ग्राम प्रति किलो बियाण्यास घेऊन चोळावे. थायरम लावत असताना अंगाला खाज सुटणे व डोळे लाल होणे यासारखे लक्षणे दिसू लागतात. ते टाळण्यासाठी हातामध्ये रबरी किंवा प्लॅस्टिकचे हातमोजे वापरावे. सर्वप्रथम रासायनिक बुरशीनाशकाची बिजप्रक्रिया करावी. त्यानंतर कीटकनाशकाची बिजप्रक्रिया करावी. त्यात थायोमिथाझ्याईम २५ टक्के एफएस ४ मिली प्रति किलो बियाणे या प्रमाणे करावी. सर्वात शेवटी जिवाणू संघ अथवा ट्रायकोड्रमा २५ ग्रॅम प्रति १ किलो बियाणे व लिक्विड असेल तर ५ मिली यानुसार, पी.एस.बी. ची बीजप्रक्रिया करावी.

बीजप्रक्रियेचे फायदे

जमिनीतून व बियाण्याद्वारे पसरणार्‍या रोगांचा प्रादुर्भाव टाळता येतो. बियाण्यांची उगवण क्षमता वाढते. रोपे सतेज व जोमदारपणे वाढतात. पिकाच्या उत्पादनात वाढ होते. बीजप्रक्रियेस कमी खर्च येतो.