Breaking

अंबाजोगाईत नात्याला काळिमा फासणाऱ्या प्रेमसंबंधांचा भयंकर शेवट

Updated: मे 28, 2026

By Vivek Sindhu

प्रियकराच्या मृत्यूनंतर सावत्र आईचीही गळफास लावून आत्महत्या

‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा

Join Channel

प्रियकराच्या मृत्यूनंतर सावत्र आईचीही गळफास लावून आत्महत्या

अंबाजोगाई: येथे सावत्र आई आणि मुलाच्या अनैतिक संबंधांमधून दोन जणांनी आत्महत्या केल्याची अत्यंत धक्कादायक आणि दुर्दैवी घटना उघडकीस आली आहे. बदनामीच्या भीतीने २१ वर्षीय मुलाने विष प्राशन करून, तर त्याच्या मृत्यूचा धक्का सहन न झाल्याने सावत्र आईने रुग्णालयाच्या परिसरातच गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली. केज तालुक्यातील सोनी जवळा येथील रहिवासी अनिल साहेबराव पवार आणि त्याची सावत्र आई अनिता साहेबराव पवार अशी मृतांची नावे आहेत. या खळबळजनक प्रकरणामुळे केज आणि अंबाजोगाई परिसरात तीव्र संताप आणि हळहळ व्यक्त होत असून, अंबाजोगाई शहर पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

या घटनेची कौटुंबिक पार्श्वभूमी पाहता, सोनी जवळा येथील साहेबराव पवार यांचा पहिल्या पत्नीसोबत घटस्फोट झाल्यानंतर त्यांनी चार वर्षांपूर्वी अनिता हिच्याशी दुसरे लग्न केले होते. मात्र, याच दरम्यान साहेबराव यांच्या पहिल्या पत्नीचा मुलगा अनिल याचे आपल्या सावत्र आईशी प्रेमसंबंध जुळले. हे अनैतिक संबंध इतके विकोपाला गेले की, काही दिवसांपूर्वी अनिल आणि अनिता हे दोघे घरातून पळून थेट तेलंगणा राज्यात गेले होते. याप्रकरणी साहेबराव पवार यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली होती. अंबाजोगाई आणि केज पोलिसांनी तांत्रिक तपासाच्या आधारे फोन ट्रॅप करून तेलंगणा गाठले आणि त्या दोघांना ताब्यात घेऊन परत आणले.

आपल्या अनैतिक संबंधांची वाच्यता समाजात झाल्याच्या नैराश्यातून आणि बदनामीच्या भीतीने अनिल याने विषारी औषध प्राशन केले होते. प्रकृती खालावल्याने नातेवाईकांनी त्याला तातडीने अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण वैद्यकीय महाविद्यालयात उपचारार्थ दाखल केले. मात्र, चार दिवसांची झुंज अपयशी ठरून उपचार सुरू असतानाच अनिलचा मृत्यू झाला. आपल्या प्रियकराच्या मृत्यूची बातमी समजताच अनिता हिला तीव्र धक्का बसला आणि तिने रुग्णालयाच्या व्यंकटराव डावळे सभागृहाच्या पाठीमागे असलेल्या एका शासकीय झाडाला गळफास लावून आत्महत्या केली.

रुग्णालयाच्या परिसरात मृतदेह आढळताच वैद्यकीय महाविद्यालयाचे डॉक्टर धपाटे यांनी तातडीने अंबाजोगाई शहर पोलिसांना पाचारण केले. माहिती मिळताच पोलीस निरीक्षक शरद जोगदंड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक कांदे व मंगेश भोले हे पथकासह घटनास्थळी दाखल झाले. डॉक्टर निलेश पुरी आणि डॉक्टर नितीन साखरे यांनी कायदेशीर वैद्यकीय तपासणी करून अनिता हिला मृत घोषित केले. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवला आहे. नात्याच्या सर्व मर्यादा ओलांडून एकत्र आलेल्या या जोडप्याच्या अशा भयानक अंतामुळे सामाजिक आणि कौटुंबिक व्यवस्थेच्या चिंधड्या उडाल्याची भावना नागरिक व्यक्त करत आहेत.


Categories

Recent Posts