Breaking
Updated: मे 15, 2026
प्रलंबित मागण्यांसाठी अंबाजोगाईत परिचारिकांचा बेमुदत संप सुरू; 'स्वाराती'मधील आरोग्य सेवा धोक्यात!
‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा
Join Channelअंबाजोगाई: येथील स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील (स्वाराती) परिचारिकांनी आपल्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी आज, १५ मे २०२६ पासून बेमुदत संपाचे हत्यार उपसले आहे. गेल्या दोन दिवसांपासून पुकारलेल्या दोन तासांच्या लाक्षणिक आंदोलनानंतरही प्रशासनाकडून कोणताही ठोस तोडगा न निघाल्याने हा निर्णय घेण्यात आला असून, यामुळे रुग्णालयातील अत्यावश्यक आरोग्य सेवा विस्कळीत होण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटनेच्या अंबाजोगाई शाखेने या आंदोलनाचे नेतृत्व केले असून, जोपर्यंत मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत कामावर न परतण्याचा पवित्रा परिचारिकांनी घेतला आहे.
परिचारिकांच्या मागण्यांमध्ये मुख्यत्वे अतिरिक्त घरभाडे भत्त्याची गेल्या एक वर्षापासूनची थकबाकी आणि महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत मिळणारा मागील सहा वर्षांचा थकीत भत्ता यांचा समावेश आहे. फेब्रुवारी २०२३ पासूनचा हक्काचा भत्ता अद्याप मिळालेला नसल्याने कर्मचाऱ्यांमध्ये तीव्र असंतोष पसरला आहे. याशिवाय रुग्णालयात कार्यरत कर्मचाऱ्यांसाठी विनामूल्य आरोग्य तपासणी आणि स्वतंत्र खिडकीची सुविधा उपलब्ध करून देण्याची आग्रही मागणीही संघटनेने केली आहे. यासंदर्भात वारंवार लेखी व तोंडी निवेदने देऊनही प्रशासनाने केवळ आश्वासन दिल्याचा आरोप संघटनेने केला आहे.
केवळ आर्थिक मागण्याच नव्हे तर कामाच्या ठिकाणच्या दुरवस्थेचा प्रश्नही या आंदोलनाच्या निमित्ताने ऐरणीवर आला आहे. रुग्णालयातील वर्ग ३ आणि वर्ग ४ च्या कर्मचाऱ्यांसाठी असलेली निवासस्थाने अत्यंत जीर्ण झाली असून त्यांची अवस्था दयनीय आहे. छतातून पाणी गळणे, उखडलेल्या फरशा, तुटलेले दरवाजे आणि खिडक्यांच्या अभावामुळे कर्मचाऱ्यांना असुरक्षित वातावरणात राहावे लागत आहे. या निवासस्थानांची तातडीने डागडुजी करण्याची मागणी परिचारिकांनी लावून धरली आहे. या आंदोलनामुळे रुग्णसेवा प्रभावित झाल्यास त्याची सर्व जबाबदारी स्थानिक प्रशासनाची असेल, असा स्पष्ट इशारा महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटनेने दिला आहे.