Breaking

बीड जिल्हासह मराठवाड्यात इंधनाचा तीव्र तुटवडा; आगाऊ पैसे भरूनही पुरवठा होत नसल्याने पंपचालक हवालदिल!

Updated: मे 3, 2026

By Vivek Sindhu

IMG 20260503 WA0033

‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा

Join Channel

बीड आणि मराठवाड्यातील विविध जिल्ह्यांमध्ये गेल्या काही दिवसांपासून पेट्रोल आणि डिझेलचा अभूतपूर्व तुटवडा निर्माण झाला असून, यामुळे सामान्य जनजीवनासह कृषी क्षेत्राला मोठा फटका बसला आहे. तेल कंपन्यांनी अचानक बदललेले आर्थिक धोरण आणि विस्कळीत पुरवठा साखळीमुळे अनेक पेट्रोल पंपांवर ‘साठा नाही’ असे फलक झळकताना दिसत आहेत. विशेषतः बीड जिल्ह्यासह ग्रामीण भागात ही परिस्थिती अधिक गंभीर असून, पंपचालकांनी लाखो रुपये आगाऊ भरूनही त्यांना इंधन मिळत नसल्याने त्यांच्यासमोर मोठे आर्थिक संकट उभे राहिले आहे.

इंधन पुरवठा करणाऱ्या कंपन्यांनी यापूर्वी पंपचालकांना पाच दिवसांची पत मर्यादा (क्रेडिट) दिली होती, मात्र इराण अमेरिका युद्धामुळे जागतिक स्तरावरील तणावाचे कारण पुढे करत ही सवलत आता पूर्णपणे बंद करण्यात आली आहे. आता कंपन्यांकडून इंधनासाठी आगाऊ रक्कम भरून घेतली जात आहे. असे असूनही, वेळेवर टँकर उपलब्ध होत नसल्याने आणि पुरवठ्यात वारंवार खंड पडत असल्याने पंपचालकांना ग्राहकांच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे. दुसरीकडे, डिझेलअभावी शेतीची कामे ठप्प झाली असून मालवाहू वाहनांच्या चाकांनाही ब्रेक लागला आहे.

या संकटामुळे मराठवाड्यातील वाहतूक व्यवस्था कोलमडण्याच्या मार्गावर आहे. पेट्रोल पंपांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या असून, तासनतास थांबूनही इंधन मिळेल याची शाश्वती राहिलेली नाही. ग्राहकांना उत्तरे देताना कर्मचारी आणि चालक मेटाकुटीला आले आहेत. ही परिस्थिती सुधारण्यासाठी शासनाने आणि संबंधित तेल कंपन्यांनी तात्काळ हस्तक्षेप करावा आणि इंधन पुरवठा पूर्ववत करावा, अशी आर्त मागणी आता इंधन विक्रेते करू लागले आहेत.


Categories

Recent Posts