Breaking
Updated: मार्च 15, 2026
‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा
Join Channelअंबाजोगाई: शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या धनेगाव येथील मांजरा प्रकल्पातील पंप हाऊसला होणारा वीज पुरवठा वारंवार खंडित होत असल्याने अंबाजोगाई नगर परिषदेचे पाणीपुरवठ्याचे वेळापत्रक कोलमडले आहे. वीज पुरवठ्यातील या सततच्या व्यत्ययामुळे जलवाहिन्यांचे पंप वारंवार बंद पडत आहेत, परिणामी शहराचा पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे.
धनेगाव सबस्टेशनला कळंब येथून १३२ केव्ही लाईनवरून वीज पुरवठा होतो. सध्या उन्हाळ्यामुळे विजेची मागणी प्रचंड वाढली आहे. त्यामुळे अतिरिक्त लोड पडत असल्याने हे केंद्र वारंवार ट्रिप होत असून, त्याचा थेट परिणाम पाणी उपसा करणाऱ्या पंपांवर होत आहे. तसेच, धनेगाव येथील इन्सुलेटर आणि तारांवर अतिरिक्त ताण येत असल्याने त्या तुटण्याचे प्रमाणही वाढले आहे. या तांत्रिक अडचणींमुळे नगराध्यक्ष नंदकिशोर मुंदडा यांनी मोठ्या प्रयत्नाने सहा दिवसांवर आणलेला अंबाजोगाई शहरातील पाणीपुरवठ्याचा कालावधी आता ८ ते १० दिवसांवर गेला आहे. त्यासोबतच केजसह परिसरातील अनेक गावांचा विद्युत पुरवठाही वर्णावर खंडित होत आहे.
या समस्येवर कायमस्वरूपी उपाय म्हणून सारूळ येथील १३२ केव्ही विद्युत केंद्राचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. त्यासाठी आमदार नमिता मुंदडा सातत्याने महावितरणकडे पाठपुरावा करत आहेत. हे काम पूर्ण होण्यासाठी आणखी काही महिन्यांचा कालावधी अपेक्षित आहे. तोपर्यंत नागरिकांना होणाऱ्या या त्रासाबद्दल नगराध्यक्ष नंदकिशोर मुंदडा यांनी दिलगिरी व्यक्त केली असून, परिस्थिती सुधारण्यासाठी प्रशासन प्रयत्नशील असल्याचे सांगितले आहे. तसेच, अंबाजोगाईसाठीची नळयोजना पूर्ण झाल्यानंतर धनेगाव येथील जीर्ण झालेल्या विद्युत तारा देखील बल्ण्यात येणार असल्याचे मुंदडा यांनी सांगितले. पुढील काळात सारूळचे केंद्र कार्यान्वित झाल्यावर आणि आडस येथील प्रलंबित प्रस्तावाला मंजुरी मिळाल्यास हा प्रश्न कायमचा सुटण्याची शक्यता आहे.