Breaking

ममदापूरमध्ये ऊसाच्या फडात वारकऱ्याचा जळालेला मृतदेह आढळल्याने खळबळ; आजारपणातून आत्महत्येचा प्राथमिक संशय

Updated: मार्च 14, 2026

By Vivek Sindhu

आजारपणातून आत्महत्येचा प्राथमिक संशय

‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा

Join Channel

अंबाजोगाई: तालुक्यातील ममदापूर शिवारात शनिवारी पहाटे एका ६० वर्षीय वारकरी वृद्धाचा ऊसाच्या शेतात जळालेल्या अवस्थेत मृतदेह सापडल्याने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. विश्वनाथ पांचाळ असे मृत व्यक्तीचे नाव असून, गेल्या अनेक दिवसांपासून ते क्षयरोगाशी झुंज देत होते. या गंभीर आजारामुळे आलेल्या नैराश्यातून त्यांनी स्वतःला पेटवून घेत जीवनयात्रा संपवली असावी, असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. ही हृदयद्रावक घटना पहाटे साडेपाचच्या सुमारास उघडकीस आली असून यामुळे ममदापूर गावावर शोककळा पसरली आहे.

ममदापूर येथील शेतकरी दिलीप मोतीराम देशमुख यांच्या गावालगत असलेल्या दोन एकर ऊसाला अचानक आग लागल्याचे त्यांच्या शेतमजुराच्या निदर्शनास आले. आग विझवण्यासाठी ग्रामस्थांनी धाव घेतली असता, ऊसाच्या सरीमध्ये एक व्यक्ती पूर्णतः जळालेल्या अवस्थेत दिसून आली. घटनेची माहिती मिळताच अंबाजोगाई ग्रामीण पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला आणि मृतदेह शवविच्छेदनासाठी अंबाजोगाईच्या स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण शासकीय रुग्णालयात पाठवला.

मृत विश्वनाथ पांचाळ हे उच्चशिक्षित असून त्यांनी एम.ए. पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले होते. वारकरी संप्रदायातील त्यांचे सक्रिय योगदान आणि सुसंस्कृत स्वभाव यामुळे गावात त्यांचा मोठा मान होता. मात्र, गेल्या काही काळापासून त्यांना क्षयरोगाचा (टीबी) त्रास होता, ज्यामुळे ते मोठ्या मानसिक तणावात होते. प्राथमिक तपासात असे समोर आले आहे की, अवघ्या आठ दिवसांपूर्वीच त्यांनी स्वतःवर ब्लेडने वार करून आत्महत्येचा प्रयत्न केला होता. त्यांच्या पश्चात दोन मुले, सून आणि एक विवाहित मुलगी असा परिवार आहे.

या घटनेला प्रशासकीय दिरंगाईची बाजूही असल्याचे समोर आले आहे. शेतकरी दिलीप देशमुख यांनी संताप व्यक्त करताना सांगितले की, शेजारील शेतकऱ्याने शेत रस्ता अडवल्यामुळे त्यांचा ऊस वेळेवर कारखान्याला जाऊ शकला नाही. या संदर्भात तहसीलदारांकडे वारंवार दाद मागूनही प्रशासनाने रस्ता मोकळा करण्यासाठी कोणतीही पावले उचलली नाहीत. जर प्रशासनाने वेळेत कारवाई करून ऊस तोडणी झाली असती, तर ही दुर्दैवी घटना टाळता आली असती, असा आरोप देशमुख यांनी केला आहे.

अंबाजोगाई ग्रामीण पोलिसांनी याप्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. आजारपणाला कंटाळून त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलले असावे, असे प्रथमदर्शनी दिसत असले तरी मृत्यूचे नेमके कारण शवविच्छेदन अहवाल आणि सखोल तपासानंतरच स्पष्ट होईल, अशी माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे. उच्चशिक्षित आणि धार्मिक प्रवृत्तीच्या व्यक्तीने अशा प्रकारे जीवन संपवल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.


Categories

Recent Posts