Breaking

सोन्याच्या दुकानातील नोकरानेच मारला पावणे सहा लाखांवर डल्ला

Updated: मार्च 13, 2026

By Vivek Sindhu

सोन्याच्या दुकानातील नोकरानेच मारला पावणे सहा लाखांवर डल्ला

‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा

Join Channel

वडवणी: तालुक्यातील वडवणी शहरात एका प्रसिद्ध सोन्याच्या दुकानात नोकरानेच मालकाचा विश्वासघात करून लाखो रुपयांचे दागिने आणि रोकड लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी वडवणी पोलीस ठाण्यात नोकराविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून परिसरात मोठी खळबळ माजली आहे.

विनय माणिकचंद नहार, वय ४० वर्षे, राहणार वडवणी, यांचे शहरात मागील अनेक वर्षांपासून ‘सूरज ज्वेलर्स’ नावाचे सोन्या-चांदीचे दुकान आहे. त्यांच्याकडे अमोल सुभाष चव्हाण, राहणार कान्हापूर तांडा, हा तरुण मागील दोन वर्षांपासून विश्वासाने नोकर म्हणून काम करत होता. १४ जानेवारी २०२६ रोजी मकर संक्रांतीच्या दिवशी सकाळी नऊच्या सुमारास दुकान उघडल्यानंतर तिजोरीतील रकमेची तपासणी केली असता, ५० हजार रुपयांची रोकड कमी असल्याचे नहार यांच्या निदर्शनास आले.

मालकाने दुकानातील सीसीटीव्ही कॅमेरे तपासले असता, कामगार अमोल चव्हाण याने काउंटरमधील ५० हजार रुपये चोरल्याचे स्पष्टपणे दिसून आले. संशय बळावल्याने अधिक तपासणी केली असता दुकानातील १ लाख २७ हजार २०० रुपये किमतीचे सोन्याचे टॉप्स आणि ४ लाख रुपये किमतीचा सोन्याचा हार असा एकूण ५ लाख ७७ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल गायब असल्याचे आढळले. चोरी पकडली गेल्यावर आरोपीने काही रक्कम परत केली, मात्र उर्वरित मुद्देमाल देण्यास तो टाळाटाळ करू लागला.

अखेर आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर विनय नहार यांनी पोलिसांत तक्रार दिली. या तक्रारीवरून वडवणी पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या कलम ३०६ अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक श्याम रामभाऊ गायकवाड हे करत आहेत.


Categories

Recent Posts